सुप्रसिद्ध लेखक, समाजसेवक डॉ. अनिल अवचट यांचे निधन
पुणे : गुरुवारी सकाळी ९.१५ वाजताच्या दरम्यान सुप्रसिद्ध लेखक, समाजसेवक डॉ. अनिल अवचट ह्यांचे दीर्घ आजाराने पुणे पत्रकारनगर येथे राहत्या घरी दुःखद निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते.
मराठी साहित्यामध्ये त्यांनी त्यांच्या पुस्तकं, लेख यांद्वारे मोलाचे योगदान दिले. त्यांनी त्यांच्या दिवंगत पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्यासोबत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली. त्यांच्या पश्चात त्यांच्या विवाहित मुली मुक्ता आणि यशोदा, अन्य कुटुंबीय, आणि मोठा मित्रपरिवार आहे.
डॉ. अनिता आणि अनिल अवचट यांच्या व्यासांमुक्तीच्या क्षेत्रातील कार्याचा वसा यापुढेसुद्धा असाच पुढे चालू राहील असा दिलासा मुक्तांगणचे अध्यक्ष डॉ. आनंद नाडकर्णी यांनी ही दुःखद बातमी सांगताना दिला.
सुप्रसिद्ध आणि संवेदनशील लेखक, समाजसेवक डॉ. अनिल अवचट यांचे निधन पुण्याच्या सामाजिक-साहित्यिक विश्वात मोठी पोकळी निर्माण करणारे आहे. आधी पत्रकार, मग लेखक आणि त्यानंतर सामाजिक कार्यकार्यात त्यांनी स्वतःला झोकून देणे सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. ‘मुक्तांगण’च्या माध्यमातून त्यांनी व्यसनमुक्तीची चळवळ उभा करुन दिलेले योगदान अत्यंत महत्त्वाचे आणि मोलाचे होते. डॉ. अनिल अवचट यांच्या स्मृती यथोचित जतन करण्याचा पुणे महापालिकेच्या माध्यमातून असेल.
मुरलीधर मोहोळ, महापौर
डॉ. अवचट यांनी मराठी पत्रकारिता आणि साहित्यिक प्रवासात आपल्या अनोख्या लेखनशैलीची महत्वपूर्ण अशी भर घातली. त्याचबरोबरीने त्यांनी सामाजिक कार्य आणि सामाजिक चळवळीतही हिरीरीने सहभाग घेतला. व्यसनमुक्ती, मानसिक आरोग्य या क्षेत्रात त्यांनी संस्थात्मक आणि भरीव असे योगदान दिले आहे. त्यांचे चौफेर लेखन आणि साहित्यकृती, सामाजिक कार्य हे पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असे आहे. त्यांचे हे योगदान महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
COMMENTS