पुण्याच्या संदर्भात आमची जबाबदारी आणि कर्तव्य याचा आम्हाला विसर पडलेला नाही | गणेश बिडकर
पुणे |पुण्याच्या संदर्भात आमची जबाबदारी आणि कर्तव्य याचा आम्हाला विसर पडलेला नाही. आम्ही पुणेकरांना बांधील आहोत, विरोधकांची टिका आम्ही सकारात्मक भावनेने स्वीकारतो आणि नियोजनबद्ध पुण्याच्या विकासाचा आमच्या संकल्पाचा पुनरुच्चार करतो. असे माजी सभागृह नेते गणेश बिडकर म्हणाले.
बिडकर म्हणाले, पुणे शहरात गेल्या काही वर्षात काही तासात अभूतपूर्व पाऊस पडण्याचे प्रमाण वाढलेले आहे, ही वस्तुस्थिती हवामान विभागाच्या आकडेवारीचे विश्लेषण केल्यावर दिसून येते. हवामान बदल हा पुण्यासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठीच मोठे आव्हान बनलेले आहे. होणारा पाउस हा या हवामानबदलाचाच फटका आहे आणि त्याच्याशी एकजुटीने संघर्ष करण्याची जशी आवश्यकता आहे, तसेच त्याच्यावर दीर्घकालिन उपाययोजना काय करता येतील यासाठी गंभीरपणे विचारविनिमय आणि कृतीकार्यक्रम आखला गेला पाहिजे. यासाठी जगभर तज्ज्ञ विचार करताहेत आणि त्या आघाडीवर जे जे निष्कर्ष काढले जाताहेत आणि काढले जातील, याचा विचार आपणही कृतीत आणायला हवा, हीच आमची प्रामाणिक भावना आहे. हा विषय राजकारणाच्या पलिकडचा आहे, हे सर्वप्रथम समजावून घेतले पाहिजे. १७ ऑक्टोबरला पडलेल्या पावसाची सरासरी ८६.८५ होती. तर शिवाजीनगर आणि हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अनुक्रमे १०५ व १२४.१९ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ६५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
बिडकर पुढे म्हणाले, पुण्यातील रस्त्यांची लांबी १४०० किलोमीटर आहे. त्यातील सर्वाधिक म्हणजे ६७२ किलोमीटरचे रस्ते ९ मीटर किंवा त्यापेक्षा कमी रूंदीचे आहेत. ९ ते १२ मीटर रूंदीचे २९८ किलोमीटर रस्ते आहेत. १२ ते २४ मीटर रूंदीचे ३१५ किलोमीटर रस्ते आहेत. पुण्यातील स्टार्म वॉटर वाहिन्यांची वहन क्षमता ५५ मिलीमीटर इतकी आहे. या संदर्भात कालच महापालिका आयुक्तांनी तपशिल सादर केलेले आहेत. पुणे शहराच्या जुन्या हद्दीत एकूण २१४ मुख्य व उपनाले आहेत. त्यांची एकूण लांबी ३६२ किलोमीटर आहेत. तसेच नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांत १६४ मुख्य व उपनाले आहेत. त्यांची लांबी १६५ किलोमीटर इतकी आहे. पुणे शहरात १२ मीटर व त्यापुढील रूंदीच्या रस्त्यांवर अंदाजे २२८ किलोमीटर लांबीची पावसाळी लाईन असून त्यावर ३० हजार ३९१ चेंबर्स आहेत. पाणी शिरण्याच्या ४२ घटना घडल्यात. या आपत्तीनंतर विविध विभागांच्या कामांवर आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून समन्वय ठेवण्यात येत होता. पावसामुळे समस्या उद्भवणारा २४५ ठिकाणांची यादी पावसाळ्यापूर्वीच करण्यात आली होती आणि योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी कृतीही सुरू होती.
बिडकर यांनी सांगितले कि, १७ ऑक्टोबर रोजी झालेल्या पावसानंतर महापालिकेचे अधिकारी आणि अन्य कर्मचारी असे १२५ जण परिस्थितीवर देखरेख करीत होते. महापालिका आयुक्त स्वतः लक्ष ठेवून होते. पूरस्थिती उद्भवल्यास नागरिकांचे स्थलांतर करावे लागल्यास त्या दृष्टीने ३७ केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली होती, तसेच २४ तास यंत्रणा कार्यरत ठेवण्यात आल्या होत्या. १७ आक्टोबरच्या स्थितीनंतर तातडीने पडझड आणि नुकसान झालेल्याचे पंचनामे करण्यासाठीचा प्रस्ताव तात्काळ जिल्हाधिकार्यांकडे पाठवण्यात आलेला आहे.
बिडकर म्हणाले, पुण्यातील मतदारांनी भारतीय जनता पक्षावर खूप मोठ्या विश्वासाने जबाबदारी टाकलेली आहे. पुणेकरांना होणारा त्रासाबद्दल आम्हाला वेदनाच होतात. या शहराला सुस्थितीत आणण्यासाठीच आम्ही वचनबद्ध आहोत आणि त्यासाठीच राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सारे सातत्याने प्रयत्नशील आहोत. राजकीय सामना करण्याची ही वेळ नाही, परंतु चार वर्षांपूर्वी पुण्यात असाच अभूतपूर्व पाऊस झाल्यानंतर आंबिल ओढ्याला संरक्षक भिंत घालण्याचे तसेच नव्याने कल्व्हर्टचे काम आमच्याच पक्षाने केलेले आहे. पुण्याचा ३० वर्षे रखडलेला विकास आराखडा आम्ही संमत केला. तो आराखडा तीस वर्षांपूर्वीच प्रामाणिकपणे अंमलात आणला असता तर पुण्याची वाहतूक आणि अनेक विषय त्याचवेळी मार्गी लागले असते. पुण्यातील समाविष्ट गावातील सर्व हितसंबंध पूर्ण झाल्यानंतर बकाल करून ती पुण्याच्या हद्दीत आलीत. या उपनगरांतील व्यवस्थांची दाणादाण झाल्यानंतर ती महापालिकेत आली. त्यासाठी कोणतेही बजेट दिलेले नाही. याचेही उत्तर शोधले तर पुण्यातील अनेक समस्यांचे मूळ समजेल. पुण्याची मेट्रो यांनी १५ वर्षे अडकावून ठेवली आणि आज पुण्यातील वाहतूक कोंडींबद्दल खोटे अश्रू हे ढाळता आहेत. पुण्याच्या संदर्भात आमची जबाबदारी आणि कर्तव्य याचा आम्हाला विसर पडलेला नाही. आम्ही पुणेकरांना बांधील आहोत, त्यांची टिका आम्ही सकारात्मक भावनेने स्वीकारतो आणि नियोजनबद्ध पुण्याच्या विकासाचा आमच्या संकल्पाचा पुनरुच्चार करतो. असे ही बिडकर म्हणाले.