कसबा जिंकण्याची आम्हांला अपेक्षा नव्हती | शरद पवार
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पुण्यातील शिवाजीनगरातील मोदी बाग येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी शरद पवार यांनी रवींद्र धंगेकरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी १० हजार ९४० मतांनी भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला. कसबा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होताच धंगेकर यांनी केसरीवाडा येथील मुक्ता टिळक यांच्या निवासस्थानी जाऊन टिळक कुटुंबीयांची भेट घेतली होती. तसेच त्यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते विद्यमान खासदार गिरीश बापट यांचीदेखील दोन दिवसांपूर्वी भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली होती. यावेळी गिरीश बापट यांनी धंगेकर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या होत्या.
गेल्या काही दिवसांपासून पुणे-मुंबईसह महाराष्ट्रात कसबा पोटनिवडणुकीची चर्चा चालू आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी ११ हजाराहून जास्त मतांनी भाजपाच्या हेमंत रासने यांचा पराभव केला. त्यामुळे २८ वर्षांपासून भाजपाच्या हातात असणारा हा मतदारसंघ काँग्रेसनं जिंकला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून भाजपावर टीका केली जात असताना भाजपाकडूनही त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. यावर आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भूमिका मांडली आहे. तसेच, त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही टोला लगावला आहे.
यावेळी बोलताना शरद पवारांनी आपल्या स्वत:लाच कसबा निवडणूक जिंकण्याची अपेक्षा नव्हती, असं म्हटलं आहे. “तो भाजपाचा गड आहे असं बोललं जात होतं. तिथे अनेक वर्षं गिरीश बापटांनी प्रतिनिधित्व केलं होतं. पुण्यातील बिगर भाजपा वर्गाशी मैत्रीचे संबंध हे बापटांचं वैशिष्ट होतं. त्यामुळे त्यांचं वर्चस्व असलेला मतदारसंघ आपल्याला जड जाईल असा आमचा अंदाज होता. पण शेवटी शेवटी त्यांनी बापटांच्या सल्ल्याने निर्णय घेतले की नाही याची कुजबुज ऐकायला मिळाली. त्यामुळे बापटांना किंवा टिळकांना डावलून घेतलेल्या निर्णयांचा फटका बसेल आणि त्याचा फायदा होईल असा अंदाज होता”, असं शरद पवार म्हणाले.