मुळा धरणातून पारनेर शहरासाठी पाणी पुरवठा योजना मंजूर – उपमुख्यमंत्री अजित पवार
अहमदनगर :- मुळा धरणाच्या बॅक वाॅटरमधून पारनेर शहरातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर करण्यात येत असून या योजनेचे विद्युत देयक नियमितपणे भरावे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज श्री क्षेत्र पिंपळनेर येथे केले.
पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपळनेर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर, संत निळोबारायांच्या राहत्या वाड्याचा जिर्णोद्धाराचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते झाला. त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,गृह मंत्री दिलीप वळसे पाटील,जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, आ. निलेश लंके, चैतन्य महाराज देगलुरकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व्यासपिठावर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले, महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा आहे. संत परंपरेत वारकरी संप्रदायाचे मोठे योगदान आहे. संत साहित्य आपला अध्यात्मिक ठेवा आहे. संतांनी मानवकल्याणाची शिकवण दिली असून या विचारांवर महाराष्ट्र मार्गक्रमण करत आहे. ही परंपरा सर्वांनी पुढे चालू ठेवली पाहिजे.
पारनेर शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेसंबधी सर्व प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची सूचना पवार यांनी यावेळी संबंधिताना केली. श्री क्षेत्र पिंपळनेरला प्रतीपंढरपूर म्हणून नावलौकिक मिळाला आहे. संत निळोबाराय मंदिर परिसरातील विविध विकास कामांसाठी तिर्थक्षेत्र विकास योजनेतून पन्नास लक्ष रुपयांची मदत देण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले .
कोरोनाकाळात आमदार निलेश लंके यांनी केलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक करुन सर्वांनी शासनाने जारी केलेल्या प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे आणि कोरोना प्रतिबंधात्मक लशीचे दोन्ही डोस घ्यावे असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.
गृह मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. तसेच राज्यातील कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत ठेवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संत परंपरेत श्री निळोबारायांच्या स्थान अतिशय महत्त्वाचे असल्याचे आणि सर्वजण समान असून आपापसात कोणताही भेदभाव नाही ही शिकवण संत निळोबारायांनी दिल्याचे सांगितले.
आ. निलेश लंके यांनी प्रास्ताविकात श्री क्षेत्र पिंपळनेर येथील प्रस्तावित योजनांची माहिती दिली. पारनेर परिसरातील विकास कामे मंजूर करून त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा असे सांगितले.
श्री संत निळोबाराय अभंग गाथेचे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंत्रीमहोदयांनी संत निळोबारायांच्या समाधीचे दर्शन घेतले. कार्यक्रमाला ग्रामस्थ, भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
COMMENTS