बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूस, म्हाळुंगेचा पाणी प्रश्न तात्काळ सोडवा
| भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या महापालिका प्रशासनाला सूचना
पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे पुण्यातील नागरी सुविधा सक्षम करणं काळाची गरज आहे. बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूस, म्हाळुंगे आदी भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. महापालिकेने हा प्रश्न तत्काळ सोडवावा, अशा सूचना भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महापालिका प्रशासनाला केल्या.
बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुस-म्हाळुंगे परिसरातील नागरिकांना भेडसावत असलेल्या पाणी प्रश्नाबाबत कोथरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वात आज पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार व पाणी पुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत आयोजित करण्यात आलेली पाणीपुरवठा समस्या निवारण बैठक बाणेर येथील अमोल बालवडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर संपन्न झाली.
या बैठकिचे आयोजन मा.नगरसेवक अमोल बालवडकर, मा.नगरसेविका ज्योतीताई गणेश कळमकर, स्वप्नालीताई प्रल्हाद सायकर यांनी केले होते.
यावेळी पुरेसा पाऊस पडुन धरणांमध्ये पाणी साठा असुनही फक्त प्रशासनाच्या पाणी वितरणाच्या अनियोजित धोरणांमुळे बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुस-म्हाळुंगे गावांना अपुरा पाणी पुरवठा होत आहे. तसेच वारंवार पाठपुरावा करुन देखिल अधिकारी या गंभिर पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी आयुक्तांना निदर्शनास आणुन दिले.
“जागो-जागी पाईप लाईन मधुन होत असलेली गळती थांबवुन, पंप दुरुस्त करुन तसेच वितरण व्यवस्थेत सातत्य ठेवुन लवकरात लवकर या भागाला पुन्हा एकदा सुरळित पाणी पुरवठा करावा” अशी मागणी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी मनपा आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली.
यावेळी आयुक्तांनी बाणेर बालेवाडी परिसराला पाणीपुरवठा करणारे जे पंप आहेत ते पंप लवकरात लवकर दुरुस्त करून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा तसेच वाढीव पंप लावण्यासंदर्भात सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. तसेच नव्याने समाविष्ठ सुस-म्हाळुंगे-बावधन बु. या गावांसाठी पुणे मनपा मार्फत पाणी पुरवठा करण्यासाठीचा आराखडा तयार झाला असुन लवकरच याकरीता निधी उपलब्ध करुन दिला जाईल व या गावांमध्ये देखिल पुणे मनपा मार्फत पुरेसा पाणी पुरवठा करण्यात येईल असे आश्वासित केले.
यासोबतच जोपर्यंत या गावांमधील पाणी प्रश्न मार्गी लागत नाही व पाईप लाईन विकसित होत नाहित तोपर्यंत बाणेर-बालेवाडी-पाषाण सहित नविन समाविष्ठ गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा असे चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. तसेच प्रशासनाच्या मदतीकरीता या भागातील सर्व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातुन व लोकसहभागातुन विविध भागात टाक्यांची उभारणी करण्यात येईल व सर्वत्र पाणी पुरवठा करण्यात येईल असे आश्वासित केले. तसेच २४x७ अंतर्गत बांधण्यात आलेल्या ८ टाक्या तातडीने सुरू करण्याचेही आदेश मा.चंद्रकांतदादांनी पुणे मनपा आयुक्त व अधिकारी यांना दिले.
याप्रसंगी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पाणी पुरवठा विभागाचे सर्व अधिकारी, बाणेर बालेवाडी येथील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, सर्व पत्रकार बांधव, विविध सोसायटीचे चेअरमन-सेक्रेटरी व पदाधिकारी तसेच समस्त नागरिक उपस्थित होते.