सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मनपा कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून काम सुरु!
| क्षेत्रीय कार्यालय स्तरावरून चांगला प्रतिसाद
14 मार्च पासून महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी त्यांच्या मागण्यांकरिता बेमुदत संपावर गेले आहेत. ‘नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी ही या संपाची प्रमुख मागणी आहे. पुणे महानगरपालिकेच्या सगळ्या कामगार युनियन चा या संपाला व मागण्यांना पूर्ण पाठिंबा आहे. मात्र यामुळे नागरिकांचे नुकसान होऊ नये म्हणून काम बंद न ठेवण्याचा निर्णय कामगार संघटनानी घेतला आहे. मात्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काळ्या फिती लावून कर्मचाऱ्यांनी काम सुरु ठेवले आहे. अशी माहिती पीएमसी एम्प्लॉईज युनियन चे सरचिटणीस आशिष चव्हाण यांनी दिली. (PMC employees Union)


पेन्शन बाबत पुकारण्यात आलेल्या संपाला महापालिकेच्या सर्व कामगार संघटनाचा पाठिंबा आहे. मात्र दहावी बारावीच्या परीक्षा आणि नागरिकांची कामे याबाबत कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही काम सुरु ठेवले आहे. मात्र हे काम आम्ही काळ्या फिती लावून करत आहोत. काळ्या फिती लावण्याचे दोन अर्थ होतात. एक म्हणजे निषेध करणे आणि दुसरा म्हणजे सरकारचे आमच्या मागण्यांकडे लक्ष वेधणे. लक्ष वेधण्यासाठी आमचे कर्मचारी काळ्या फिती लावून काम करत आहेत. मात्र त्याबाबत बंधन नाही. कर्मचाऱ्यांनी हे उस्फुर्तपणे करायला हवे.