TMV Pune | लोकमान्य टिळक प्रतिष्ठान आणि ‘टिमवि’तर्फे ‘स्वस्त दिवाळी, मस्त दिवाळी’
TMV Pune | पुणे : सर्वसामान्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी लोकमान्य टिळक प्रतिष्ठान (Lokmanya Tilak pratishtan) आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ (Tilak Maharashtra Vidyapeeth) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वस्त दिवाळी, मस्त दिवाळी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. २ नोव्हेंबर ते रविवार दि. ५ नोव्हेंबर या कालावधीत बाजीराव रस्त्यावरील नातू बाग मैदानावर हा उपक्रम होत आहे.
लोकमान्य टिळक प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक (Dr Rohit Tilak) यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
जिल्हाधिकारी श्री. राजेश देशमुखपोलिस आयुक्त श्री. रितेश कुमारटिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा होणार आहे.
सर्वसामान्य नागरिकांना दिवाळीच्या फराळापासूनदिवाळी साजरी करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व वस्तू, साहित्य एकाच छताखाली आणि ते देखील स्वस्त किंमतीत उपलब्ध व्हावे, हा ‘स्वस्त दिवाळी, मस्त दिवाळी’ उपक्रमाचा उद्देश आहे, असे सांगून डॉ. टिळक म्हणाले, कोरोनाच्या संकटामुळे सामान्य नागरिकांना मोठा फटका बसला. त्यातून हळूहळू प्रत्येक जण सावरला. मात्र, वाढत्या महागाईमुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. अशावेळी त्यांचा सण गोड व्हावा, दर्जेदार फराळ आणि दिवाळीसाठी गरजेच्या वस्तू कमी किमतीत त्यांना मिळाव्यात याकरता लोकमान्य टिळक प्रतिष्ठान आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यांनी पुढाकार घेतला आहे.
नातू बाग मैदानावर ‘स्वस्त दिवाळी, मस्त दिवाळी’ मध्ये चाळीस स्टॉल्स असतील. स्टॉलधारकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, सर्व स्टॉल्स मोफत उपलब्ध करून देण्यात येत असून हा सर्व खर्च लोकमान्य टिळक प्रतिष्ठान आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ उचलणार आहे. दर्जा, गुणवत्ता यामध्ये कोणतीही तडजोड होऊ न देता सर्व स्टॉलधारकांनी नागरिकांना बाजारभावापेक्षा किफायतशीर दरात दिवाळीच्या साहित्याची विक्री करावी, एवढी एक अट आहे. अनेक नामांकित ब्रँडससह व्यावसायिक, व्यापारी ‘स्वस्त दिवाळी, मस्त दिवाळी’ उपक्रमात सहभागी होत आहेत. बाजारभावापेक्षा अतिशय कमी किंमतीत त्यांच्याकडून दर्जेदार साहित्याची विक्री केली जाईल. लोकमान्य टिळक प्रतिष्ठानदेखील स्वतंत्र स्टॉल उभारणार असून स्टॉलवर अवघ्या १०० रुपयांमध्ये तीन किलो साखर दिली जाईल. सुमारे २५ हजार नागरिकांना सुविधेचा लाभ होईल. त्याचबरोबर या स्टॉलवर तेल, डाळी आणि मोती साबण स्वस्त दरात नागरिकांना मिळेल.
पहिल्या दिवशी, दि. २ नोव्हेंबर रोजी ‘स्वस्त दिवाळी, मस्त दिवाळी’ उपक्रमाची वेळ सायंकाळी पाच ते रात्री दहा आणि दुसऱ्या दिवसापासून सकाळी आठ ते रात्री दहा, अशी राहणार आहे, अशी माहिती देऊन डॉ. टिळक यांनी सांगितले की, या कालावधीत नातू बाग मैदानावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल राहिल. यामध्ये पहिल्या दिवशी सायंकाळी ६ वाजता ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा लोकप्रिय कार्यक्रम सादर होईल. शनिवार दि. ४ नोव्हेंबर रोजी संदीप पाटील ‘खेळ पैठणीचा’ हा खास कार्यक्रम महिलांसाठी सादर करणार आहे. या शिवाय मनोरंजनाचे कार्यक्रम, तसेच पाककला, मेहंदी, टॅटू, ज्यूट बॅग पेंटिंग, फ्लॅश मॉब, ड्रम सर्कल असे भरगच कार्यक्रम होणार आहेत. दररोज ६ लकी ड्रॉ काढले जाणार असून विजेत्यांना रोख रकमेची पारितोषिके दिली जातील. याचबरोबर, नातू बाग मैदानावर रायगड किल्ल्याची भव्य प्रतिकृती साकारण्यात येत असून ती बालगोपाळांसाठी आकर्षण ठरेल. ‘स्वस्त दिवाळी, मस्त दिवाळी’ उपक्रमाचा सुमारे दोन लाख नागरिकांना फायदा होईल, अशी अपेक्षा आहे.
नागरिकांना प्रत्येक सण आनंदात साजरा करता यावा यासाठी अनेक घटक सणांच्या दिवशीही कार्यरत असतात. त्यामध्ये अग्नीशामक दलाचे जवान, पोलिस कर्मचारी, वाहतूक पोलिस, विद्युत मंडळाचे कर्मचारी, परिचारिका, लष्करी जवान यांसह अनेकांचा समावेश असतो. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘स्वस्त दिवाळी, मस्त दिवाळी’ उपक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात काही प्रातिनिधिक सत्कार केले जाणार आहेत, असे डॉ. टिळक यांनी नमूद केले.