Tilak Maharashtra Vidyapeeth | मेरी माटी मेरा देश अभियानाअंतर्गत टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने घेरा पानवडी येथे वृक्षारोपण मोहीम संपन्न!
Tilak Maharashtra Vidyapeeth | टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे (Tilak Maharashtra Vidyapeeth Pune) यांनी शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून पुरंदर तालुक्यातील पुरंदर किल्ल्याच्या (Purandar Fort) पायथ्याशी वसलेल्या घेरा पुरंदर गट ग्रामपंचायती अंतर्गत येणारे घेरा पानवडी हे गाव संस्थात्मक सामाजिक जबाबदारी अंतर्गत शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून दत्तक घेतले आहे. विद्यापीठाच्या समाजकार्य विभागाच्या वतीने सदर गावचे सामाजिक सर्वेक्षण तसेच संसाधनांचे सर्वक्षण करून गरजांच्या अध्ययनाचा अहवाल तयार केला आहे. सर्वेक्षणाच्या माध्यमातून आलेल्या गावकऱ्यांच्या समस्या आणि गरजा यांना उत्तर आणि समाधान शोधण्यासाठी गाव विकासाचा कृती आराखडा तयार करून विद्यापीठाच्या समाजकार्य विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने सदर गावच्या शाश्वत विकासासाठी वेळोवेळी लोकसहभागाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. (Tilak Maharashtra Vidyapeeth)
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षाअंतर्गत केंद्र शासनाच्या वतीने मेरी माटी मेरा देश (Meri Mati Mera Desh) हे अभियान देशभर राबविले जात आहे. सदर अभियानांतर्गत टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने तसेच नर्सिंग विभागाच्या वतीने स्वातंत्र्यासाठी अविरत परिश्रम घेतलेल्या किंबहुना स्वतःचे बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांना श्रद्धांजली म्हणून आणि त्यांचे विचार देशातील नागरिकांनी अंगी जोपासावेत आणि अमलात आणण्याचे प्रयत्न करावेत यासाठी शपथ घेण्यात आली. त्याचबरोबर थोर महापुरुष आणि स्वातंत्र्य सेनानी यांच्यावरती काव्यवाचन आणि कथाकथन अशा प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. याच
अनुषंगाने मेरी माटी मेरा देश या अभियानाचा पुढील टप्पा म्हणून मौजे घेरा पानवडी या गावांमध्ये शुक्रवार दिनांक १८ ऑगस्ट २०२३ रोजी एकूण १०० देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. यामध्ये कडुलिंब, पिंपळ, वड, चिंच इत्यादी वृक्षांची लागवड करण्यात आली. घेरा पानवडी गावातील ढगारे आळी, कारकुड आळी, राजे शिवछत्रपती विद्यालय परिसर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसर, बेंगळे वस्ती, कोकरे वस्ती आणि पठारे वस्ती इत्यादी भागामध्ये वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे. सदर वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी देखील त्या त्या परिसरातील नागरिक आणि विद्यार्थी यांच्यावर सोपविण्यात आली आहे आणि तशी नागरिकांनी हमी देखील दिली आहे की आम्ही त्या वृक्षांचे चांगल्या प्रकारे संगोपन करू. या अभियानामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे नोंदणीकृत स्वयंसेवक अनुक्रमे हॉटेल मॅनेजमेंट विभाग, विधी विभाग, फिजिओथेरपी विभाग आणि समाजकार्य विभाग इत्यादी विभागातील ४० जणांनी आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या एकूण ४ कार्यक्रम अधिकारी यांनी सहभाग घेतला.
सदर अभियान यशस्वी होण्यासाठी विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक, कुलगुरू, डॉ. गीताली टिळक, कुलसचिव, डॉ. सुवर्णा साठे , उपाध्यक्ष, डॉ. रोहित टिळक, शैक्षणिक सल्लागार, डॉ. प्रणती टिळक आणि विद्यापीठाचे सचिव अजित खाडीलकर सर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
या अभियानाच्या आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम समन्वयक श्री. ओंकार केणे यांचे अविरत सहकार्य लाभले. सदर अभियान यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. निलेश उपाध्ये, श्री. रोहन बावडेकर, योगेश पाटील, इत्यादींनी अथक परिश्रम घेतले. या अभियानाचे उत्कृष्ट समन्वय राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रकाश यादव आणि निता कदम यांनी केले.
——-
News Title | Tilak Maharashtra Vidyapeeth | Under Meri Mati Mera Desh Abhiyan, Tilak Maharashtra University completed tree plantation campaign at Ghera Panwadi!