प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पूर्ण अर्थसंकल्पीय तरतूद
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ७० कोटी रुपयांची पूर्ण अर्थसंकल्पीय तरतूद उपलब्ध करून देण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, महापालिका क्षेत्रात खराडी, वडगाव खुर्द येथे प्रत्येकी एक आणि हडपसर येथे तीन असे पाच प्रकल्प आवास योजनेअंतर्गत सुरू असून, २९१८ सदनिकांचे बांधकाम करण्यात येत आहे. यासाठी अंदाजपत्रकात ७० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. कोविड काळात विविध प्रकारच्या आरोग्य विषयक उपाययोजना करण्याच्या उद्देशाने सर्वच भांडवली विकासकामांवरील तरतुदींमध्ये दहा टक्के कपात करण्यात आली होती. त्या प्रमाणे आवास योजनेच्या तरतुदीत सात कोटी रुपयांची कपात करण्यात आली होती.
रासने पुढे म्हणाले, मात्र या प्रकल्पांची महारेरा कायद्या अंतर्गत नोंदणी झाली असल्यामुळे निर्धारीत वेळेत लाभार्थ्यांना सदनिकांचा ताबा देणे आवश्यक आहे. अन्यथा महारेराच्या वतीने दंड आकारला जाऊ शकतो. वेळेत काम पूर्ण करण्याच्या उद्देशाने आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याने विशेष बाब म्हणून आवास योजनेतील निधीत १० टक्के कपात न करता, अंदाजपत्रकात तरतूद केल्याप्रमाणे पूर्ण ७० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.
—–
पीएमपीएमएलच्या पुणे स्टेशन डेपोत इलेक्ट्रिक चाजिंग स्टेशन
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपीएमएल) पुणे स्टेशन येथील डेपोत विद्युत विषयक विविध कामे करण्यासाठी स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, पीएमपीएमएलच्या पुणे स्टेशन येथील डेपोत इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनला विद्युत पुरवठा करण्याच्या उद्देशाने ही विकासकामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी सुमारे ४ कोटी ९५ लाख रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली. पुढील तीन महिन्यांत ही काम पूर्ण होणे अपेक्षित आहेत.
—-
कोथरुडच्या तात्यासाहेब थोरात उद्यानात बॅटरी ऑपरेटर मोनोरेल
बाल चमूंचे विशेष आकर्षण ठरणारा बॅटरी ऑपरेटर मोनोरेल प्रकल्प कोथरुडच्या तात्यासाहेब थोरात उद्यानात सुरु करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, या प्रकल्पात ७२ व्होल्ट डीसी बॅटरी ऑपरेटर मोनो रेल असणार आहे. दोन बोग्या आणि चालकाच्या दोन केबिन असणार आहेत. त्यासाठी ४१० आरएमटी ट्रॅक तयार करण्यात येणार असून, सुरक्षा रेलींग, प्लॅटफॉर्म, तिकिट घर याची निर्मिती करण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या निर्मितीसह पाच वर्षांच्या देखभालीसाठी कलकत्यातील ब्रेथवेट कंपनीबरोबर प्रशासनाने करार करण्यासाठी आवश्यक असणार्या सुमारे ५ कोटी ४७ लाख रुपयांच्या तरतुदीला स्थायी समितीने मान्यता दिली.
—–
पावसाळी पाणी व्यवस्थापन प्रकल्पासाठी निधी
शहराच्या विविध भागांमध्ये पावसाळी पाणी व्यवस्थापन प्रकल्पाअंतर्गत विविध विकासकामे आणि देखभाल दुरुस्तीसाठी सुमारे ३६ कोटी ५६ लाख रुपयांच्या निधीला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, शहरातील पावसाळी पाणी व्यवस्थापन प्रकल्पाच्या तिसर्या टप्प्याच्या अंतर्गत ही कामे करण्यात येणार आहेत. त्यामध्ये नाला विकसित करणे, कल्व्हर्ट बांधणे, पावसाळी पाण्याच्या ड्रेनेज लार्इन टाकणे अशा विकासकामांचा समावेश आहे. कोथरुड, वारजे, बावधन, पाषाण, धानोरी, विश्रांतवाडी, येरवडा, मनोरुग्णालय, विमाननगर, वडगाव शेरी, हडपसर, कोंढवा, शनिवार पेठ, दत्तवाडी, हिंगणे, वडगाव, वाडिया आदी परिसरात ही विकासकामे होणार आहेत.
COMMENTS