‘महाराष्ट्र बंद’ १००टक्के यशस्वी होणार
महाविकास आघाडीच्या नेत्यांना विश्वास
पुणे – लखीमपूर खिरी येथील आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी घालून मारण्याचा प्रकार, उत्तर प्रदेश सरकारचे हुकूमशाही वर्तन आणि देशातील लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने उद्या (सोमवारी) महाराष्ट्र बंद पुकारला असून जनतेतून मिळणारा प्रतिसाद पाहाता हा बंद यशस्वी होईल, असा विश्वास महाविकास आघाडी आणि समविचारी पक्ष, संघटनांच्या एकत्रित बैठकीत व्यक्त करण्यात आला.
सकाळी 11 वा निर्धार सभा
‘महाराष्ट्र बंद’च्या नियोजनासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष, समविचारी पक्ष यांची बैठक आज (रविवारी) झाली. या बैठकीला पुणे शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष रमेश बागवे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेनेचे शहर उपप्रमुख प्रशांत बधे, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहनदादा जोशी, नगरसेवक रवींद्र धंगेकर, शहर उपाध्यक्ष बाळासाहेब मारणे, शेतकरी बचाव कृती समितीचे नितीन पवार, लोकायत संघटनेचे स्वप्निल फुसे आदी उपस्थित होते.
महाविकास आघाडी आणि समविचारी संघटनांच्या वतीने उद्या (सोमवारी) सकाळी ११वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निर्धार सभा घेण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. महाविकास आघाडी आणि समविचारी पक्ष, संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपापल्या भागातून रॅली काढून सभेच्या ठिकाणी येणार आहेत.
शहरातील रिक्षा संघटना, पीएमपी कामगार संघटना, विद्यार्थी संघटना यांनी बंदला पाठिंबा जाहीर केला आहे. व्यापाऱ्यांनीही बंदमध्ये सहभागी व्हावे याकरीता महाविकास आघाडीच्या वतीने व्यापारी संघटनांना आवाहन करण्यात आले.
महाराष्ट्र बंद यशस्वी करण्यासाठी विधानसभेच्या आठ मतदारसंघात आघाडीचे घटक पक्ष, शेतकरी बचाव कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवर लोकांशी संपर्क साधून बंदमध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे. उद्या (सोमवारी) आघाडीतील घटक पक्ष आणि संघटना शांततामय मार्गाने बंद यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
COMMENTS