पिंपळे गुरव परिसरात पीएमपीएल बसने घेतला पेट
: अर्धी बस जळून खाक
पुणे : पिंपळे गुरव येथून दापोडीला जोडणाऱ्या पुलावर बुधवारी सकाळी साडे दहा वाजता सीएनजी असलेल्या पीएमपीएल बसने अचानक पेट घेतला. यावेळी बस मध्ये ६५ प्रवाशी असल्याचे बस वाहक यांनी सांगितले. बस चालक यांच्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. पीएमपीएल बस ही पिंपळे गुरव बस स्थानकावरून खडकी बाजार मार्गे मार्केट यार्ड या दिशेने जाण्यास निघाली होती. यावेळी बसची पुढील अर्धी बाजू संपूर्ण जळून खाक झाली होती.
पिंपळे गुरव बस स्थानकावरून ११ नंबर पिंपळे गुरव ते मार्केट यार्ड ही बस वेळेनुसार साडे दहा वाजता प्रवाशी घेऊन निघाली. बसमध्ये सकाळी सकाळी अनेक चाकरमानी, शाळकरी मुले, प्रवाशी असे एकूण ६५ प्रवाशी बसमध्ये प्रवास करीत होते. यावेळी बस चालक लक्ष्मण हजारे तसेच बस वाहक मारुती गायकवाड हे बस क्र. एम एच १२ एच बी १४३८ ही बस घेऊन मार्केट यार्ड दिशेने प्रवाशी घेऊन निघाली होती. त्रिमूर्ती चौकातून पुढे जात असताना पुलावर अचानक बस बंद पडली. यावेळी केबिनमधील बस ड्रायव्हरने बसच्या गेअर बॉक्स कडे पाहिले असता त्यातून धूर निघत असल्याचे निदर्शनास आले.
यावेळी बस चालक, वाहक यांनी प्रसंगावधान समजून घेत त्वरित प्रवाशांना बस मधून खाली उतरवले. अवघ्या पाच मिनिटात बस मधून मोठ्या प्रमाणात धूर बाहेरील हवेत पसरत असताना दिसून आले. यानंतर दहा मिनिटाच्या आत बसच्या पुढील बाजूने पेट घेण्यास सुरुवात झाली. बस पेट घेत असतानाच रहाटणी, पिंपरी येथील अग्निशामक दलाची वाहने दाखल झाली. यावेळी अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्परता दाखवत आग आटोक्यात आणली.
अर्ध्या तासानंतर अर्धी बस तसेच बस मधील केबिन संपूर्ण जळून खाक झाली होती. स्थानिक स्वीकृत नगरसेवक महेश जगताप, सांगवी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई हंसराज गोरे, रविंद्र पाटील यांनी दोन्ही बाजूने वाहतूक बंद करून नागरिकांना घटनास्थळी न येण्यास प्रयत्न केले. रस्त्याच्या दोन्ही बाजूने यावेळी वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूने बघ्याची भूमिका घेणाऱ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती.
COMMENTS