महापालिका खरेदी करणार 5 लाख तिरंगा ध्वज! | 85 लाखांचा येणार खर्च
| मेडिकल कॉलेजच्या कामातून वर्गीकरण केले जाणार
पुणे | स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत ‘ हर घर तिरंगा ‘ उपक्रम राबविणेकरीता महापालिका 5 लाख तिरंगा ध्वज पायल इंडस्ट्रीज, पुणे यांचेकडून खरेदी करणार आहे. यासाठी 84,82,500 अर्थात चौऱ्यांऐंशी लक्ष ब्याऐंशी हजार पाचशे रुपये चा खर्च येणार आहे. ही रक्कम मेडिकल कॉलेज साठी प्रस्तावित केलेल्या रकमेतून वर्ग केली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे.
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या पर्वानिमित्त दिनांक 12/03/2021 ते दिनांक 5/08/2023 या कालावधीत “आजादी का अमृत महोत्सव” या उपक्रमाचे आयोजन करण्याबाबत केंद्र शासनाने कळविले आहे. त्यानुसार राज्यात सदर कालावधीमध्ये “भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याबाबत निर्णय / शासन पत्रांद्वारे यापूर्वीच वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत. केंद्र शासनाच्या संस्कृति मंत्रालयाने जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी मनात हावी व त्याचे संस्मरण व्हावे या उद्देशाने “आजादी का अमृत महोत्सव” अंतर्गत 11 ऑगस्ट 2022 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये देशभरात “हर घर तिरंगा” हा उपक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे.
या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचना एकत्रित करून राज्य शासनाने शासन परिपत्रक प्रसृत केलेले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत ‘ हर घर तिरंगा ‘ उपक्रम राबविणेकरीता तिरंगा ध्वज पुरविणे या कामासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यात 3 ठेकेदारांनी सहभाग घेतला होता. त्यानुसार पायल इंडस्ट्रीज ने 84 लाख 82 हजार 500 इतका कमी दर दिला होता. त्यामुळे महापालिका संबंधित कंपनीला काम देणार आहे. ही रक्कम मेडिकल कॉलेज साठी प्रस्तावित केलेल्या रकमेतून वर्ग केली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे. यावर समितीच्या पुढील बैठकीत चर्चा होईल.