नाट्यगृहाच्या पार्किंग मधून महापालिकेला मिळणार वर्षाला 50 ते 60 लाख उत्पन्न!
| पार्किंग बाबत लवकरच टेंडर प्रक्रिया
पुणे | महापालिका प्रशासनाकडून शहरात विविध ठिकाणी नाट्यगृह बांधण्यात आली आहेत. मात्र तिथे असलेल्या पार्किंग व्यवस्थेमधून महापालिकेला तोकडे उत्पन्न मिळते. मात्र आता आगामी काळात महत्वाच्या नाट्यगृहाच्या पार्किंग मधून महापालिकेला चांगलेच उत्पन्न मिळणार आहे. या नाट्यगृहाच्या पार्किंग साठी महापालिका टेंडर प्रक्रिया राबवणार आहे. महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाकडून याची तयारी सुरु करण्यात आली आहे. (Pune Municipal corporation)
महापालिकेच्या महत्वाच्या नाट्यगृहामध्ये बालगंधर्व रंगमंदिर, गणेश कला क्रीडा रंगमंच, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक, पं भीमसेन जोशी कलामंदिर, महात्मा फुले सांस्कृतिक भवन, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह यांचा समावेश आहे. या नाट्यगृहामध्ये चांगलीच गर्दी असते. प्रेक्षक आणि नाटककारांच्या देखील ही नाट्यगृहे पसंतीस उतरली आहेत. महापालिकेकडून इथे पार्किंग व्यवस्था देखील करण्यात आली आहे. मात्र यातून महापालिकेला काही उत्पन्न मिळत नाही. उलट खर्चच करावा लागतो. काही ठेकेदारांना भाडे तत्वावर पार्किंग चालवण्यास देण्यात आले होते. मात्र त्या ठिकाणी ठेकेदारांची मक्तेदारी होऊ लागली. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी येऊ लागल्या. त्यामुळे महापालिका स्वतः पार्किंग चालवत होती.
मात्र आता याबाबत सांस्कृतिक विभागाने कडक धोरण करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार 5 पार्किंग भाडे तत्वावर दिली जाणार आहेत. कोथरूडच्या नाट्यगृहाचे काम चालू असल्याने त्याची प्रक्रिया नंतर करण्यात येणार आहे. मात्र बाकी 5 ची लवकरच टेंडर प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यामध्ये गणेश कला क्रीडा रंगमंच आणि बालगंधर्व च्या पार्किंग मधून महापालिकेला वार्षिक प्रत्येकी 18 लाख 46 हजारांचे उत्पन्न मिळणार आहे. अण्णाभाऊ साठे स्मारकामधून 14 लाख, महात्मा फुले सांस्कृतिक भवन मधून जवळपास 8 लाख आणि भीमसेन जोशी कलामंदिर मधून 90 हजार, असे 50 ते 60 लाखाचे उत्पन्न महापालिकेला मिळणार आहे. (PMC Theaters)