The Karbhari 4th Anniversary | “The कारभारी” च्या वाचकांना ४ थ्या वर्धापनदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! | समतोल, संतुलित आणि सकारात्मक भाव ठेवत दमदार वाटचाल करूया!
आपली “The कारभारी” वृत्तसंस्था आज चार वर्षाची झाली. आपण आता पाचव्या वर्षात पदार्पण करत आहोत. कुठलीही संस्था ही लोकांच्या भक्कम पाठिंब्याशिवाय तग धरू शकत नाही. खरे म्हणजे लोकाधार हेच संस्थेचे नैतिक मूल्य असायला हवे. एखाद्या संस्थेला लोक देखील तेव्हाच पाठिंबा देतात जेव्हा ती संस्था लोकांच्या हितासाठी काम करते, नैतिक मूल्यांची पाठराखण करते. समतोल, संतुलित आणि सकारात्मक भाव ही मूल्ये “The कारभारी” ने पहिल्यापासूनच आपलीशी केली आहेत. त्यामुळे लोक “The Karbhari” शी जुडले गेले आहेत. हीच या संस्थेची ताकद आहे.
पत्रकार आणि पत्रकारिता या गोष्टी आज खूप सवंग झाल्या आहेत. असे मानणाऱ्या लोकांची संख्या आज खूप प्रमाणात आहे. हे क्षेत्र कधी नव्हे एवढे बदनाम झाले आहे. असे असले तरीही लोकांना अजून तरी आपल्या आसपास काय घडते, हे जाणून घेण्याची आवश्यकता असते. त्यांना माहिती आणि विश्वसनीय माहिती हवी असते. त्यामुळे लोक बातम्या वाचू, ऐकू, बघू पाहतात. मात्र ते जेव्हा माध्यमे पाहतात, वाचतात तेव्हा त्यांना आश्वासक काही दिसत नाही. नकारात्मकता आणि सनसनाटीपणा मात्र दिसतो. त्यामुळे लोक निराश होतात. अशा लोकांचा आपण आधार आहोत. आपली “The कारभारी” संस्था सकारात्मक आणि आश्वासक अशाच बातम्या देते. फक्त लोकांनी आपले काही वाचावे म्हणून आपण काही देत नाही, तर जे लोकहित आहे आणि लोकांनी हे वाचणे गरजेचे आहे, त्यांना ही माहिती मिळणे आवश्यक आहे, अशाच गोष्टी आपण लोकांना देतो. त्यामुळे लोक मग “The कारभारी” कडे लोक पत्रकारितेतील एक आश्वासक चेहरा म्हणून पाहत आहेत. त्यांच्या आशा वाढीस लागत आहेत.
लोकगाडा सुरळीत चालावा म्हणून नोकरशाही निर्माण झाली. न्यायव्यवस्था निर्माण झाली. नोकरशाही वर वचक ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधी चे मंडळ नेमले गेले. या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पत्रकारिता अस्तित्वात आली. मात्र हा चौथा स्तंभ कोलमडताना दिसतो आहे. अशा पडझड अवस्थेत “The कारभारी” ने आपली जबाबदारी समर्थपणे पेलली आहे. वाचकांचे प्रेम मिळवले आहे. आपल्यावर लोक लक्ष ठेवतात, ही जाणीव ठेवून आपण बातम्या देतो, लेख लिहितो. याला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे.
पुणे महापालिका, पीएमपी, पुणे स्मार्ट सिटी, पीएमआरडीए अशा विविध शासकीय संस्थातील प्रश्न आपण मांडतो. नुसते मांडत नाही तर त्याचा पाठपुरावा करून ते सोडवण्याचा देखील प्रयत्न करतो. पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकारी यांच्याशी संबंधित विविध प्रश्न आपण मांडत आणि सोडवत आलेले आहोत. पुणेकरांच्या समस्या आपण उजेडात आणतो, त्या प्रशासन कडून कशा मार्गी लागतील, याचा पाठपुरावा करतो. हे असे असणे हे “The कारभारी” चे यश आहे.
आगामी काळात देखील लोकांचा आश्वासक चेहरा बनत आपण दमदार वाटचाल करणार आहोत. तुम्ही आम्ही सोबत मिळून ही वाट चालायची आहे. हे व्रत आहे. ते समर्थपणे आणि जबाबदारीने पेलायचे आहे. तुमची साथ यात महत्वाची आहे. त्याचसाठी आम्ही तुम्हाला साद घालतो आहोत.
पुनःश्च तुम्हां सर्वांना शुभेच्छा!
– मुख्य संपादक
The Karbhari

COMMENTS