अदानी समुहात केलेली गुंतवणूक धोक्यात आली असून जनतेचा पैसा बुडण्याची भिती | नाना पटोले
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वाखाली आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अलका टॉकीज र्चाक येथील LIC बिल्डींगच्या समोर अदानी समुहात केंद्र सरकारच्या आदेशावरून केलेल्या गुंतवणुकीच्या निषेधार्थ निदर्शने आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. आ. नानाभाऊ पटोले, माजी गृहमंत्री मा. सुशिलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री आ. अशोक चव्हाण, आ. पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम, पुणे जिल्हा निरीक्षक आ. संग्राम थोपटे, आ. अमर राजूरकर, आ. संजय जगताप, माजी आ. उल्हास पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री आ. अशोक चव्हाण म्हणाले की, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाने ७० वर्षात कमावलेली संपत्ती उद्योगपती मित्र अदानीला देण्याचा सपाटा लावला आहे. एवढ्यावरच न थांबता त्यांनी देशातील जनतेने मोठ्या कष्टाने कमावलेला व भविष्याची तरतूद म्हणून SBI, LIC मध्ये गुंतवलेले हजारो कोटी रुपये ही अदानीच्या कंपन्याना दिले. आता हे हजारो कोटी रुपये बुडण्याची भिती निर्माण झाली आहे. तरीही केंद्र सरकार मूग गिळून गप्प बसले आहे. ‘अदानी’ समूहातील गैरकारभाराची चौकशी करावी व जनतेचा पैसा सुरक्षित रहावा यासाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला आहे.’’
यानंतर माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, ‘‘एलआयसी व स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या देशाचे गौरव आहेत. या वित्तीय संस्थांमध्ये सर्वसामान्य, मध्यमवर्ग, नोकरदार, छोटे व्यापारी यांनी आपल्या मेहनतीचा पैसा गुंतविला आहे. परंतु मोदी सरकारने अदानींच्या कंपन्यांमध्ये हा पैसा जबरदस्तीने गुंतविला आहे. अदानी समुहातील गैरकारभारामुळे एलआयसीच्या ३९ कोटी पॉलिसीधारक व गुंतवणूकदारांचे ३३ हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे तसेच भारतीय स्टेट बँक व इतर बँकांनी मिळून तब्बल ८० हजार कोटी रूपयांचे कर्ज दिले आहे. एलआयसी, स्टेट बँक ऑफ इंडिया व इतर सरकारी वित्तीय संस्थांमधील अदानी समुहात केलेल्या मोठ्या गुंतवणुकीसंदर्भात संसदेत चर्चा व्हावी व गुंतवणूक दारांच्या पैशाला संरक्षण मिळावे यासाठी सरकारने योग्य ते निर्णय घ्यावा.’’
यानंतर प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले म्हणाले की, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती मित्र गौतम अदानी यांच्या उद्योग समुहात एसबीआय, एलआयसी व इतर सरकारी वित्तीय संस्थांचा पैसा नियम डावलून गुंतवला. अदानी समुहातील ही गुंतवणूक आता धोक्यात आली असून जनतेचा पैसा बुडण्याची भिती निर्माण झाली आहे. अदानी समुहातील आर्थिक गैर कारभाराचा पर्दाफाश करणाऱ्या हिडनबर्ग संस्थेच्या अहवालाची संयुक्त संसदीय समितीतर्फे चौकशी व्हावी अथवा सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी करावी अशी मागणी आम्ही करीत आहोत. उद्योगपती गौतम अदानी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे घनिष्ट संबंध जगजाहीर आहेत. या संबंधातूनच सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि विमा कंपन्यांनी जनतेच्या कष्टाचा पैसा अदानीच्या उद्योग समुहात कसलाही विचार न करता गुंतवला आहे. विमानतळ, रेल्वे, वीजसेवा, रस्ते, बंदरे यासह देशातील सर्व महत्वाचे सरकारी उद्योग अदानींच्या घशात घातलेले आहेत. यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक व सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी मधील जनतेचा पैसाही अदानीच्या खिशात घातला आहे. अदानीच्या गैरकारभाराचा फुगा आता फुटला असून लाखो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, हा पैसा जनतेचा आहे. एवढा मोठा घोटाळा होऊनही मोदी सरकार, पंतप्रधान आणि अर्थमंत्री गप्प आहेत हे अतिशय लाजीरवाणे व असंवेनशीलपणाचे लक्षण आहे.’’
या आंदोलनाचे सूत्रसंचालन ब्लॉक अध्यक्ष सचिन आडेकर यांनी केले तर आभार सुजित यादव यांनी मानले.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, ॲड. अभय छाजेड, बाळासाहेब शिवरकर, दिप्ती चवधरी, कमल व्यवहारे, गोपाळ तिवारी, वीरेंद्र किराड, अमिर शेख, लता राजगुरू, रफिक शेख, अजित दरेकर, शिवाजी केदारी, पुजा आनंद, मेहबुब नदाफ, नीता रजपूत, राजेंद्र शिरसाट, मुख्तार शेख, सुनिल शिंदे, साहिल केदारी, राहुल शिरसाट, प्रवीण करपे, सतिश पवार, सुनिल घाडगे, शोएब इनामदार, रमेश सकट, भुषण रानभरे, अनिल सोंडकर, भरत सुराणा, राहुल तायडे, रवि आरडे, शिवराज भोकरे, हेमंत राजभोज, अक्षय माने, सुंदरा ओव्हाळ, पपिता सोनावणे, राधिका मखामले, सुमन इंगवले, सौरभ अमराळे, वाल्मिक जगताप, अजय खुडे, राकेश नामेकर, राजू नाणेकर, राजू शेख, गणेश शेडगे आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.