The idea of ​​Hindu Rashtra  | हिंदुराष्ट्राची कल्पना गांधी विचारांना अभिप्रेत नाही  – प्रा. डॉ. शंकर कुमार संन्याल यांचे प्रतिपादन

HomeपुणेBreaking News

The idea of ​​Hindu Rashtra | हिंदुराष्ट्राची कल्पना गांधी विचारांना अभिप्रेत नाही – प्रा. डॉ. शंकर कुमार संन्याल यांचे प्रतिपादन

Ganesh Kumar Mule Aug 24, 2022 2:53 AM

Pune Ring Road | पुणे चक्राकार महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रियेला गती
Property Tax | PMC | 40% कर सवलत | महापालिकेचा तात्पुरता दिलासा | गरज मात्र कायमस्वरूपी निर्णयाची 
Davat-a-iftar | द्वेषाची आग थांबवून बंधुभाव वाढवा | सर्वपक्षीय नेत्यांचा सूर

हिंदुराष्ट्राची कल्पना गांधी विचारांना अभिप्रेत नाही

– प्रा. डॉ. शंकर कुमार संन्याल यांचे प्रतिपादन

महाराष्ट्र हरिजन सेवक संघाची राज्यस्तरीय बैठक

पुणे : “देशाला हिंदुराष्ट्र बनवण्याचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. मात्र, महात्मा गांधींच्या विचारांना हिंदुराष्ट्राची कल्पना अभिप्रेत नाही. अनेक संस्थांचे खाजगीकरण होत आहे. देशाला कमकुवत करण्याचा आणि धर्माधर्मात फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. अशा या बिकट परिस्थितीत गांधीविचारच देशाला एकसंध ठेवणार आहे. त्यामुळे आजच्या परिस्थितीत संपूर्ण विश्वाला मार्गदर्शक अशा गांधीविचारांचा प्रभावी प्रसार व्हावा,” असे प्रतिपादन अखिल भारतीय हरिजन सेवक संघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. शंकर कुमार संन्याल यांनी केले.

महाराष्ट्र हरिजन सेवक संघाच्या राज्यस्तरीय बैठकीत संन्याल मार्गदर्शन करत होते. टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र हरिजन सेवक संघाचे अध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, सचिव मधुकर शिरसाट, कोषाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, प्रथमेश आबनावे यांच्यासह विविध शहर व जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रा. डॉ. शंकर कुमार संन्याल म्हणाले, “समाजातील छोट्यातल्या छोट्या घटकाला जोडण्याचा विचार गांधींजीनी दिला. ते कोणी राजकीय नेते नव्हते, तरीही त्यांच्या नावाने जगभरात रस्ते, विद्यालय आणि पुतळे उभारले गेले. इंग्लंडच्या संसदेसमोर त्यांचा पुतळा उभा आहे. त्यांच्या साधेपणा, स्वावलंबन, अहिंसा, सत्याग्रह या तत्वांचा प्रभाव आहे. देशात अस्थिरता निर्माण करण्याच्या या क्षणी चांगले विचार, चांगले कार्य आणि देशाची एकता जपणारे विचार वरचढ थरातील. त्यामुळे महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांच्या विचाराने प्रेरित कार्य करणाऱ्यांनी गांधींच्या नावाने मोहीम सुरु करावी.”

“हरिजन सेवक संघाने समाजातील विषमता दूर करण्यासाठी कार्य केले आहे. मंदिर प्रवेश, पाण्याचा हक्क यावर सातत्याने आवाज उठवला आहे. चांगल्या कामासाठी सरकारकडून सहकार्य मिळत नाही. त्यामुळे गांधीविचारांविरोधातील लोकांचा अभ्यासपूर्ण व नम्रपणे सामना करून जनमानसात महात्मा गांधी रुजविण्याचाही प्रयत्न आपण केला पाहिजे,” असे प्रा. डॉ. शंकर कुमार संन्याल म्हणाले.

मोहन जोशी म्हणाले, “महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात महात्मा गांधी, विनोबा भावे आणि निर्मला देशपांडे यांचा संदेश व कार्य पोहोचवून तरुण कार्यकर्त्यांची नवी फळी उभारण्याची जबाबदारी आहे. हरिजन सेवक संघाला सप्टेंबरमध्ये ९० वर्षे पूर्ण होत असून, औरंगाबाद येथे राज्यस्तरीय, तर नवी दिल्ली येथे राष्ट्रीय परिषद होईल.”