महापालिका पदभरती साठीची परीक्षा ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता!
| उमेदवारांना पहावी लागणार वाट
पुणे महापालिकेत विविध खात्यातील 448 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-२ व गट ३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यासाठी 20 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत अर्ज मागवण्यात आले होते. मात्र यासाठी महापालिकेला उमेदवारांचा अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसला नाही. कारण 10 ऑगस्ट पर्यंत महापालिकेकडे 87 हजार 471 अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वात जास्त अर्ज लिपिक टंकलेखक (श्रेणी 3) पदासाठी 63948 दाखल झाले आहेत. दरम्यान या भरतीसाठीची परीक्षेची तारीख अजून निश्चित झालेली नाही. महापालिका प्रशासनाच्या सूत्रानुसार ही परीक्षा ऑक्टोबर महिन्यात होऊ शकते. तोपर्यंत उमेदवारांना वाट पहावी लागणार आहे.
महापालिकेत प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक व विधी सेवेमधील पदे भरण्यासाठी जाहिरात देण्यात आली होती. 2014 सालापासून महापालिकेत भरती झाली नव्हती. त्यामुळे भरती निघाल्यानंतर उमेदवारांच्या उड्या पडतील आणि लाखों अर्ज दाखल होतील. अशी महापालिका प्रशासनाला अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात 93 हजार 991 उमेदवारांची नोंदणी झाली आहे तर त्यापैकी 87 हजार 471 उमेदवारांचे शुल्क सहित अर्ज दाखल झाले आहेत.
यामध्ये 1. सहायक विधी अधिकारी (श्रेणी 2) पदा साठी 690 अर्ज आले आहेत. लिपिक टंकलेखक (श्रेणी 3) साठी 63948 अर्ज दाखल झाले आहेत. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (श्रेणी 3) साठी 17361, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) (श्रेणी 3) साठी 2146, कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) (श्रेणी 3) साठी 25 तर सहायक अतिक्रमण निरीक्षक (श्रेणी 3) साठी 3201 असे एकूण 87 हजार 471 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत.
दरम्यान महापालिकेकडून या पद भरतीचे काम IBPS या संस्थेस देण्यात आले आहे. संस्थेकडून सांगण्यात आले आहे कि, सप्टेंबर महिन्यात इतर परीक्षा असल्याने महापालिका भरतीसाठीची परीक्षा या महिन्यात घेणे शक्य नाही. त्यामुळे ही परीक्षा ऑक्टोबर महिन्यात होऊ शकते. परीक्षा कशी घ्यावी याबाबत ही महापालिका आणि संस्था या दोहोमध्ये एकमत होत नसल्याने परीक्षा घेण्यास उशीर होत आहे. यामुळे मात्र उमेदवारांना वाट पहावी लागत आहे.