भाजपने घेतलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निर्णयांची छाननी करावी
पुणेकरांच्या हिताचेच निर्णय राबवावेत
– माजी आमदार मोहन जोशी यांची महापालिका प्रशासकांकडे मागणी
पुणे – महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने पालिकेची मुदत संपण्यापूर्वी तीन महिने हजारो कोटींच्या निविदा आणि कामे यांना मंजुरी दिलेली आहे. या सर्वाची छाननी करुन मगच त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी महापालिकेचे प्रशासक विक्रम कुमार यांच्याकडे पत्रकाद्वारे केली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि नगरसेवकांनी महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घाईघाईने हजारो कोटींच्या निविदा मंजूर केल्या आहेत. या प्रक्रियेत शहर हिताला प्राधान्य देण्यापेक्षा राजकारण आणि गैरप्रकार केले आहेत. याकरिता प्रशासकांनी निर्णयांची छाननी करुन मगच त्यांची अंमलबजावणी करणे शहराच्या हिताचे ठरेल. बाराशे कोटींचा मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजपने केला. अनेक स्वयंसेवी संस्थांनी प्रकल्पाविरोधात आक्षेप नोंदविले, काँग्रेस पक्षानेही आक्षेप घेतले होते. याची दखल घेऊन जलसंपदा खात्याने प्रकल्पाची छाननी सुरु केली आहे. त्याचपद्धतीने स्थायी समिती आणि अन्य समित्यांनी घेतलेल्या निर्णयांची प्रशासकांनी छाननी करणे आवश्यक आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
महापालिकेच्या आयुक्तांनी मांडलेल्या अंदाजपत्रकात फुगवटा करुन स्थायी समितीने सुमारे साडेआठ हजार कोटींचे अंदाजपत्रक मंजूर केले आहे. अत्यंत चुकीच्या पद्धतीने केलेल्या अंदाजपत्रकाविषयी पुणेकरांच्या मनात संभ्रम आहे. तरी प्रशासकांनी शहराचे हित डोळ्यासमोर ठेवून अंदाजपत्रकाबाबतही निर्णय घ्यावेत, अशी काँग्रेस पक्षाची मागणी असल्याचे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
COMMENTS