कंत्राटी चालकाला कामावरुन कमी करणार नाही
: महापालिका आयुक्तांचे राष्ट्रीय मजदूर संघाला आश्वासन
पुणे : महानगरपालिकेतील कंत्राटी चालकांच्या प्रश्नासंदर्भात महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांच्याबरोबर बैठक झाली. कोणत्याही कंत्राटी चालकाला कामावरुन कमी करणार नाही. त्याचप्रमाणे त्यांना पूर्णवेळ काम मिळेल व या सर्व कंत्राटी कामगारांच्या पगार व इतर कायदेशीर मागण्यांबाबत लवकरच बैठक घेऊन योग्य उचित आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले जातील व सर्व कायदेशीर अधिकार या कंत्राटी कामगारांना मिळतील. असे आश्वासन आयुक्त विक्रमकुमार यांनी दिले.
यावेळी पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश दादा बागवे, राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे, कंत्राटी चालक प्रतिनिधी, संदीप पाटोळे, चंदन वंगारी, दिनेश खांडरे, व्यंकटेश दोडला, आकाश शिंदे, अभिजीत वाघमारे, गणेश पवार हे कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी पीएमपीएल मधून महानगरपालिकेमध्ये वर्ग करण्यात आलेल्या चालकांच्या संदर्भामध्ये चर्चा झाली. पीएमपीएमएल मधून आलेले चालक, पुन्हा पी एम पी एल मध्ये पाठवावेत व पुणे महानगरपालिकेमधील कंत्राटी चालकांच्या नोकरीवर गंडांतर आणू नये. त्यांना त्या ठिकाणी दैनंदिन कामकाज मिळावे अशी मागणी करण्यात आली. त्याच बरोबर इतर कंत्राटी कामगारांचे पगार वेळेवर करावेत, पगार स्लिप मिळावी, कामगार कायद्याच्या अंतर्गत फायदे मिळावेत, या मागण्या करण्यात आल्या. महापालिकेमध्ये मशानभुमी मध्ये काम करणारे कर्मचारी, पाणीपुरवठा मध्ये काम करणारे कर्मचारी, सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारे कंत्राटी कर्मचारी या सर्वच कंत्राटी कामगारांच्या पगार व इतर कायदेशीर हक्क त्याचबरोबर कामगार कायद्यांमध्ये मिळत असणारे अधिकार हे त्यांना ेण्यात यावेत यासाठी आवश्यक व योग्य ती पावले उचलावीत. अशी मागणी विक्रम कुमार यांच्याकडे करण्यात आली.
या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देताना कोणत्याही कंत्राटी चालकाला कामावरुन कमी करणार नाही. त्याचप्रमाणे त्यांना पूर्णवेळ काम मिळेल व या सर्व कंत्राटी कामगारांच्या पगार व इतर कायदेशीर मागण्यांबाबत लवकरच बैठक घेऊन योग्य उचित आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले जातील व सर्व कायदेशीर अधिकार या कंत्राटी कामगारांना मिळतील. असे आश्वासन आयुक्त विक्रमकुमार यांनी दिले.
COMMENTS