महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेस ने सुरु केली ही तयारी
: पक्षातर्फे पक्ष सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ
पुणे – प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शना नुसार शहर कॉंग्रेस महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार सोमवारी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ना. गोपाळकृष्ण गोखले पुतळा, गुडलक चौकाजवळ, फर्ग्युसन कॉलेज रोड येथे पक्ष सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ झाला. काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणांना अनुसरून समाजातील विविध घटक काँग्रेस पक्षाचे सभासद होतात. पुणेकरांतर्फे श्री. सचिन भोसले रा. येरवडा यांनी काँग्रेस पक्षाची सर्वात प्रथम सभासद नोंदणी अर्ज भरून प्राथमिक सभासद झाले.
: दिल्लीत झेंडा फडकवण्याचा संकल्प
यावेळी बोलताना शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीने १६ ऑक्टोबरच्या बैठकीत सप्टेंबर २०२२ ला पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज दि. १ नोव्हेंबर २०२१ रोजी काँग्रेस पक्षातर्फे पक्ष सभासद नोंदणीला सुरूवात झाली आहे. ना. गोपाळकृष्ण गोखले १९०५ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. आज त्यांना अभिवादन करून पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पुण्यात सभासद नोंदणी अभियानाची सुरूवात केली आहे. काँग्रेस पक्ष हे सर्वधर्म समभावाचे प्रतीक आहे. समाजातील सर्व जाती जमातीचे लोक या पक्षाचे सदस्य होऊ शकतात. काँग्रेस पक्षाला इतिहास आहे. सन १८८५ ला काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. वोमेशचंद्र बॅनर्जी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, सर फिरोज शहा मेहता, एनी. बेसंट, सरोजिनी नायडू, मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, मौलाना अबुल कलाम आझाद, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस व इतर ज्येष्ठ काँग्रेस नेते काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते. स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला. अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली व तुरूंगवास भोगला. स्वातंत्र्य मिळाल्यावर पं. जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी व इतरांनी भारत देशाला जगात लौकिक मिळवून दिला. समाजातील सर्व घटकांच्या सहकार्यामुळे आज भारत देश सुजलाम सुफलाम झाला आहे. परंतु आज देशाचे चित्र फार वेगळे आहे. महागाई, बेरोजगारी आणि चूकीच्या आर्थिक धोरणामुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. याला मोदी सरकार जबाबदार आहे. आपण सर्वांनी जनतेपर्यंत काँग्रेस पक्षाने केलेले काम आणि पक्षाचे ध्येय धोरण जनतेमध्ये पोहचवून जास्तीत जास्त सभासद नोंदवून पक्ष बळकट करावा लागेल. सन २०२४ ला काँग्रेस पक्षाचा तिरंगा झेंडा दिल्लीत फडकला पाहिजे असा संकल्प करूयात.’’
यावेळी पुणे मनपाचे काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल, माजी महापौर कमल व्यवहारे, दत्ता बहिरट, नगरसेविका लता राजगुरू, नगरसेवक अविनाश बागवे, अजित दरेकर, राजेंद्र शिरसाट, मुख्तार शेख, नीता रजपूत, महिला अध्यक्षा सोनाली मारणे, अजित जाधव, रजनी त्रिभुवन, राजेंद्र भुतडा, रमेश सकट, प्रविण करपे, सुरेश कांबळे, भारत पवार, बाबा सैय्यद, संदीप मोरे, गौरव बोराडे, नारायण पाटोळे, राहुल वंजारी, राजश्री अडसुळ, शारदा वीर, विठ्ठल गायकवाड आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
COMMENTS