Kasba Constituency | कसबा मतदार संघातील वाड्यांचा पुनर्विकास करण्यासाठी काँग्रेस ने महापालिका आयुक्ताकडे केली ही मागणी

HomeपुणेBreaking News

Kasba Constituency | कसबा मतदार संघातील वाड्यांचा पुनर्विकास करण्यासाठी काँग्रेस ने महापालिका आयुक्ताकडे केली ही मागणी

Ganesh Kumar Mule Mar 13, 2023 12:50 PM

Arvind Shinde | भवन रचना विभागाकडील टेंडर प्रक्रिया राजकीय हस्तक्षेपामुळे रद्द करू नये | काँग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांची आयुक्ताकडे मागणी
Pune Congress Dispute | अरविंद शिंदे यांना संघटनेतील कामकाजाची माहिती नसल्याने पक्षाला कमकुवत करण्याची कृती बालिशपणाची | नरुद्दीन अली सोमजी
Congess Pune | काँग्रेसच्या पूर्वजांनी केलेल्या बलिदानामुळे भारत देश हा सुदिन पाहत आहोत | अरविंद शिंदे

कसबा मतदार संघातील वाड्यांचा पुनर्विकास करण्यासाठी काँग्रेस ने महापालिका आयुक्ताकडे केली ही मागणी

कसबा मतदार संघातील जुन्या वाड्यांच्या रखडलेल्या पुनर्विकास बाबत साईड मार्जिन मध्ये १००% सवलत द्यावा व चटई निर्देशांक वाढवावा. अशी मागणी पुणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे करण्यात आली आहे.

याबाबत शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. त्यानुसार पुणे शहरातील कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये उत्तर पेशवाई पासून अस्तित्वात असलेल्या व मोडकळीस आलेल्या किमान पाच ते सात हजार वाड्यांचा पुनर्विकासाचा प्रश्न प्रचलित बांधकाम नियमावली व विकास आराखड्यात वेळोवेळी गावठाणातील वाड्यांबाबत नियमावलीत वस्तुस्थिती अवलोकन न केल्यामुळे रखडलेला आहे. जवळपास ४ लाखाहुन जास्त संख्येने पुणेकर या जीवितास धोकादायक व मोडकळीस असलेल्या बांधकाम वास्तूमध्ये जीव मुठीत धरून राहत आहेत ही वस्तुस्थिती आहे.

येथील जुने वाडे आणि इमारतींचा पुनर्विकास हा मोठा जटिल प्रश्न युध्द स्तरावर सोडविणे काळाची गरज आहे. छोट्या क्षेत्रफळाचे वाडे आणि भाडेकरूंची संख्या अधिक असणे, २०१० पासून शनिवार वाड्याच्या शंभर मीटर परिसरातील बांधकामांवर आलेली बंदी, २०१६ पासून नऊ मीटर रुंदीच्या आतील रस्त्यांवर टीडीआर वापरण्यास घालण्यात आलेली बंदी, २०१७ मध्ये मंजूर विकास आराखड्यात पेठांसाठी कोणतीही विशेष सवलत न देणे आणि २०२० मध्ये राज्यासाठी लागू केलेल्या एकात्मिक बांधकाम विकास नियंत्रण नियमावलीत (यूडीसीपीआर) वाड्यांसाठी चटई क्षेत्र निर्देशांकांत (एफएसआय) वाढ न देणे, १५ मीटर उंचीच्या वर गेल्यानंतर साइड मार्जिनसाठी जागा सोडणे या व अशा किचकट नियमांमुळे पेठांमधील भागांचा विकास होऊ शकलेला नाही. या कारणांचा परिणाम वाड्यांच्या विकसनावर झाला आहे. तर जुन्या इमारतींनादेखील याचा फटका बसला आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे कि, पुणे शहराच्या कसबा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट पेठांमध्ये असलेल्या वाड्यांच्या रखडलेल्या प्रश्नाचा निपटारा करणेसाठी परदेशातील धर्तीवर अपवादात्मक व विशेष बाब म्हणून साईड मार्जिनमध्ये पूर्ण सवलत व वाड्यांसाठी चटई क्षेत्र निर्देशांकमध्ये वाढ करण्यात यावी. अशी प्रमुख मागणी गांभीर्यपूर्वकरित्या पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आपल्या कडे करीत आहोत. साईड मार्जिन मध्ये सवलत व चटई निर्देशांक वाढवल्यास भाडेकरू व वाडा मालक यांच्यात सामंजस्य निर्माण होऊ शकते, पुनर्विकासासाठी विकसक प्रतिसाद देऊ शकतात व वेगाने परिसराचा ३५ वर्षांपासून रखडलेला विकासाचा मुद्दा मार्गी लागू शकतो.