पुण्याच्या सौंदर्यावर घाला घालू नये – रमेश बागवे
पुण्याचं वैभव असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराला मोठा सांस्कृतिक वारसा आहे. ५४ वर्षांपूर्वी पु. ल. देशपांडे यांच्या संकल्पनेतून हे रंगमंदिर उभे राहिले. आज पुणे शहरात एकूण १४ नाट्यगृह असून शहरात फक्त ३ नाट्यगृहच सुरू आहेत. बालगंधर्व नाट्यगृह पुण्याचे वैभव आहे. या वास्तूला पाडून तेथे मल्टीफेल्क्स मॉल करण्याचा प्रशासनाचा डाव आहे. या वास्तूला पाडू नये याचा निषेध करण्यासाठी आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिराच्या बाहेर आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘पुणे हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असून बालगंधर्व रंगमंदिर हे पुण्याची शान आहे. या रंगमंदिरात अनेक दिग्गज कलाकारांनी आपले नाट्य व कला सादर केली आहे. बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनामध्ये अनेक छायाचित्रप्रदर्शने, व्यंग चित्रकारांचे व्यंगचित्रे प्रदर्शित केली जात आहेत. या कलाकारांना पुणे महानगरपालिका अल्पदारात रंगमंदिर उपलब्ध करून देत होते. सध्याचे बालगंधर्व रंगमंदिर साडेबावीस हजार चौरस फूट जागेवर असून मूळ वास्तू पाडून साडेतीन लाख चौरस फुटांचे रंगमंदिर बांधण्यात येणार आहे. त्यामुळे कलाकारांना यापुढे वाढीव दराने रंगमंदिर उपलब्ध होईल. पुणे महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता असताना त्यांनी बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याचा प्रस्ताव प्रशासनापुढे ठेवला. पुणेकरांशी चर्चा न करता किंवा भावना समजून न घेता एवढ्या घाईगडबडीत हा प्रस्ताव ठेवण्याचे काय कारण आहे हे आजपर्यंत पुणेकरांना समजले नाही. काँग्रेस पक्ष नेहमी कला संस्कृतीला प्राधान्य देत आहे. बालगंधर्वचे मल्टीफेल्क्स मॉल करून काही मोजक्या राज्यकर्ते व बिल्डरांना फायदा होऊन देणार नाही. पुण्याच्या सौंदर्यावर कोणी घाला घालण्याचा प्रयत्न केला तर काँग्रेस पक्ष विरोध केल्याशिवाय राहणार नाही.’’
यानंतर माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी म्हणाले की, ‘‘बालगंधर्व रंगमंदिरामध्ये कार्यक्रम पाहण्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून जनता येत आहे. पुण्यनगरीतील अतिशय मोक्याच्या ठिकाणी ही वास्तू आहे. या वास्तूला पाडून त्याठिकाणी मल्टीफेल्क्स मॉल करण्यात आला तर बालगंधर्वचे वैभव संपुष्टात येईल. २०१७ च्या निवडणुकीमध्ये पुणेकरांनी भाजपावर विश्वास टाकून त्यांना मते दिली आणि ते सत्तेवर आले. सत्तेचा गैरवापर करून या बालगंधर्व रंगमंदिराचे मल्टीफेल्क्स मॉल करणे म्हणजे पुणेकरांशी विश्वासघात करणे. पुणेकरांची भावना दुखावणाऱ्या भाजप सरकारचा मी तीव्र निषेध करतो.’’
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, संजय बालगुडे, कथ्थक नर्तक डॉ. नंदकिशोर कपोते, नगरसेवक रविंद्र धंगेकर, अविनाश बागवे, अजित दरेकर, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, महिला अध्यक्षा पुजा आनंद, बाळासाहेब दाभेकर, युवक अध्यक्ष राहुल शिरसाट, रजनी त्रिभुवन, शेखर कपोते, शानी नैशाद, नुरुद्दीन सोमजी, राजेंद्र शिरसाट, विठ्ठल गायकवाड, सतिश पवार, राजेंद्र भुतडा, प्रविण करपे, सचिन आडेकर, अजित जाधव, अनुसया गायकवाड, ज्योती परदेशी, प्रशांत सरसे, मुन्नाभाई शेख, अकबर शेख, अविनाश अडसूळ, सोमेश्वर बालगुडे, ताई कसबे, नंदा ढावरे शोभना पण्णीकर, राजू गायकवाड, राजाभाऊ कदम, संतोष डोके, क्लेमेंट लाजरस, शारदा वीर, स्वाती शिंदे, मीरा शिंदे, सेल्वराज ॲन्थोनी आदी उपस्थित होते.
COMMENTS