TET Exam | रविवारी १ हजार ४०० परीक्षा केंद्रावर होणार टीईटीची परीक्षा
Maharashtra News – (The Karbhari News Service) – महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा येत्या रविवार २३ नोव्हेंबर रोजी राज्यभरातील ३७ जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी १ हजार ४२३ परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षा परिषदेमार्फत उपाययोजना करण्यात आल्या असल्याची माहिती परिषदेच्या अध्यक्षांनी कळविली आहे. (Pune News)
परीक्षेच्या पेपर १ साठी २ लाख ३ हजार ३३४ तर पेपर २ साठी २ लाख ७२ हजार ३३५ असे एकूण ४ लाख ७५ हजार ६६९ परीक्षार्थी प्रविष्ट होणार आहेत. परीक्षार्थींना ओळख पटवूनच प्रवेश देण्यात येईल. परीक्षा दालनामध्ये मोबाईल, स्मार्ट वॉच, कॅलक्युलेटर इत्यादी इलेक्ट्रॉनिक साहित्य घेऊन जाता येणार नाही.
सर्व परीक्षा दालनामध्ये, परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावर व केंद्र संचालकांच्या कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होत असल्याचे निदर्शनास आल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल. परीक्षेसंदर्भात समाजमाध्यम व प्रसारमाध्यमांद्वारे दिल्या जाणाऱ्या चुकीच्या बातम्या, अफवांवर विश्वास न ठेवता परीक्षा परिषदेच्या https://www.mscepune.in व http://mahatet.in या संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना व माहितीचे अवलोकन करावे, असेही कळविण्यात आले आहे.

COMMENTS