MFDA Meeting | व्यवसायवृद्धीसाठी मिठाई, फरसाण, दुग्ध व्यावसायिकांनी संघटीत व्हावे!
| ‘एमएफडीए’च्या मेळाव्यात फिरोज नक्वी यांचे आवाहन
MFDA Meeting | व्यवसायवृद्धीसाठी मिठाई, फरसाण, डेअरी व्यावसायिकांनी संघटीत व्हावे असे आवाहन फेडरेशन ऑफ स्वीट्स अँड नमकीन मॅन्युफॅक्चर्सचे संस्थापक फिरोज नक्वी यांनी येथे केले. (Chitale mithaiwale pune)
मिठाई, फरसाण, डेअरी असोसिएशन,पुणेतर्फे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी असोसिएशनचे अध्यक्ष संजय चितळे होते तर व्यासपीठावर अन्न व औषध प्रशासनाचे माजी सहआयुक्त शिवाजी देसाई, फूड सेफ्टी तज्ज्ञ शशांक जोशी, असोसिएशनचे कार्याध्यक्ष मुरलीधर चौधरी, सचिव अमित अग्रवाल हे उपस्थित होते.
यावेळी फिरोज नक्वी म्हणाले की,भारतीय खाद्य संस्कृतीत मिठाई, फरसाण आणि दुग्धजन्य पदार्थांना एक वेगळे स्थान आहे. त्यामुळे पारंपारिक असलेल्या या व्यवसायाला आधुनिकतेची जोड दिली पाहिजे. आज पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण होत आहे. विशेषतः युवा पिढी त्याकडे आकृष्ट होत आहे. त्यामुळे युवा पिढीला आपल्या पारंपारिक खाद्य पदार्थांचे महत्व करून देण्यासाठी ब्रॅण्डिंग, पॅकेजिंग यावर भर दिला पाहिजे. आज परदेशातील कंपन्या शिरकाव करत आहेत मात्र ते आपले अनुकरण करत आहेत. दुर्दैवाने आपल्याकडे शासन स्तरावर होणारे निर्णय हे आपल्याला जाचक तर परदेशी कंपन्यांच्या पथ्यावर पडत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे शासन स्तरावर आपल्याला व्यवसायाच्या अनुषंगाने भेडसावणारे प्रश्न सोडविण्यासाठी आपण एकी दाखवली पाहिजे. त्यामुळे आपसात स्पर्धा करू नका तर शासन स्तरावर जाचक अटी- नियमांना हद्दपार करण्यासाठी दबावगट निर्माण केला पाहिजे. त्यासाठी स्थानिक पातळीवर गावागावात, प्रत्येक शहरात आणि राज्यांमध्ये मिठाई, फरसाण, डेअरी असोसिएशन,पुणे सारख्या संस्थांची व्याप्ती वाढली पाहिजे,त्या बळकट केल्या पाहिजे तरच आपला व्यवसाय ग्लोबल पातळीवर पोहोचणे सहज शक्य आहे. फक्त त्यासाठी संघटन हे खूप महत्वाचे आहे ,असेही ते म्हणाले.
यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे माजी सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी नव्या कार्यकारिणीला शपथ दिली. शिवाजी देसाई यांनी ‘फॉसकॉस – एफएसएसएआय ‘बाबत तसेच परवाना/नोंदणी ,अर्ज प्रक्रियेबाबत माहिती देताना त्यांनी कायदयाचे पालन किती महत्वाचे आहे याकडे लक्ष वेधले. तर फूड सेफ्टी तज्ज्ञ शशांक जोशी यांनी फुड प्रोसेसिंग, क्वालिटी, फॅट्स,स्टॅंडर्ड, लॅब तपासणी यासह पॅकिंगबाबत शासनाची नियमावली व एफएसएसएआयचा नवा कायदा यावर सविस्तर माहिती दिली.
मिठाई, फरसाण, डेअरी असोसिएशन,पुणेचे अध्यक्ष संजय चितळे यांनी मिठाई भारतीय खाद्य संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे मात्र आजही या क्षेत्रातील ७० टक्के व्यावसायिक असंघटीत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले तसेच तरुण पिढीला काय आवडेल यानुसार पारंपारिक मिठाईमध्ये बदल करा. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा, समाज माध्यमांचा प्रभावी वापर करावा आणि आपला व्यवसाय आता ऑनलाईनही केला पाहिजे असे स्पष्ट करून संजय चितळे यांनी येत्या काळात असोसिएशनच्या माध्यमातून व्यापक स्तरावर विविध उपक्रम राबवले जातील अशी ग्वाहीही दिली.
प्रास्ताविकात असोसिएशनचे सचिव अमित अग्रवाल यांनी परवाना, नोंदणी तसेच शासकीय अध्यादेश सोप्या भाषेत समजावून देण्यासाठी सर्व प्रकारचे साहाय्य केले जाईल. लॅबबरोबर सहकार्य करार करून व्यावसायिकांना दिलासा दिला जाईल. नव्या पिढीसाठी युथ विंग असो किंवा सर्व सभासदांचा व्यावसायिक दर्जा उंचावण्यासाठी दर तीन महिन्यांनी कार्यशाळा घेतल्या जातील, त्यासाठी जास्तीस जास्त संख्यने सभासद होण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.तर इंद्रनिल चितळे व सुमित अग्रवाल यांनी पारंपारिक व्यवसायाची धुरा हाती घेणाऱ्या उच्चशिक्षित युवा पिढीसाठी युथ फोरम या उपक्रमाची माहिती दिली. सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले तर आभार मकरंद गाडवे यांनी मानले.
ज्येष्ठ व्यावसायिकांचा सन्मान
या मेळाव्यात माधवराव चितळे, तोलाराम चौधरी, अमरनाथ अग्रवाल, लेखराज अग्रवाल , नारायणराव घोडके, श्रीकृष्ण चितळे, सुरेंद्र गाडवे, अरविंद बुधानी या ज्येष्ठ व्यावसायिकांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला तसेच विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या युवराज गाडवे, अनिल गाडवे, कैलास झंवर, इंद्रनिल चितळे यांचाही विशेष गौरव करण्यात आला.
—–
Sweets, Farsan,Milk professionals should organize!| Feroze Naqvi’s appeal at the meeting of ‘MFDA’