बाल विकास मंदिर शाळेत क्रीडा शिबिर संपन्न
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील बाल विकास मंदिर शाळेत ११ ते २८ एप्रिल २०२३ या कालावधीत उन्हाळी क्रीडा शिबिर, छंद वर्गाचे आयोजन केले होते.
यात लंगडी, गोल खो-खो , डॉजबॉल, एरोबिक्स व्यायाम प्रकार यासोबत विविध क्रीडा प्रकारांचा समावेश होता. तसेच छंद वर्गात विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी चित्रकला, हस्ताक्षर यांचा देखील समावेश केला होता.
या शिबिरात विद्यार्थ्यांना खेळाचे मार्गदर्शन कु. अर्पिता जगताप, कु. सुरुची जगताप यांनी केले. चित्रकलेसाठी माधुरी जगताप यांनी तर हस्ताक्षरसाठी दीपक कांदळकर यांनी मार्गदर्शन केले.
आज रोजी या क्रीडा शिबिराचा समारोप समारंभ पार पडला. याप्रसंगी वाघिरे कॉलेज , सासवड येथील आर्मी एन. सी.सी. चे मेजर श्री.दीपक जांभळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. श्री. जांभळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे, व्यायामाचे महत्त्व सांगितले. आहार कसा असावा याविषयी मार्गदर्शन केले. जांभळे हे शाळेचे माजी विद्यार्थी असल्याने शाळेच्या आठवणी त्यांनी याप्रसंगी बोलताना सांगितल्या. विद्यार्थ्यांसोबत सायकलिंग करण्याची इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच त्यांनी केलेल्या सायकल प्रवासाचे अनुभव सांगितले. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी जांभळे यांना विविध प्रश्न विचारले. विशेष म्हणजे छंदवर्गात विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रे, बनवलेल्या वस्तू यांचे प्रदर्शन यावेळी भरविण्यात आले होते.
यावेळी पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मेघा जांभळे , सर्व शिक्षक उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय मंजुषा चोरामले यांनी करुन दिला. माणिक शेंडकर, नरेंद्र महाजन, माधुरी जगताप, अश्विनी कदम यांनी प्रशस्तीपत्र देतेवेळी सहभागी विद्यार्थ्यांची नावे घोषित केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक कांदळकर यांनी केले. आभार आशा ढगे यांनी मानले.