Special Article | Welcome to Indore : इंदौर हे देशातलं सगळ्यात स्वच्छ शहर का आहे?

HomeBreaking Newsपुणे

Special Article | Welcome to Indore : इंदौर हे देशातलं सगळ्यात स्वच्छ शहर का आहे?

कारभारी वृत्तसेवा Dec 02, 2023 12:21 PM

Hydrogen Gas | महापालिकेच्या हायड्रोजन गॅस निर्मिती प्रकल्पाची निरी करणार तपासणी! | 12 लाखांचा येणार खर्च
Garbage Project in Merged Villeges : समाविष्ट 23 पैकी 4 गावांत होणार कचरा प्रक्रिया प्रकल्प  : 3 कोटींचा येणार खर्च
PMC Garbage Project : पुणे शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पर्यावरणमंत्री-नगरविकासमंत्री बैठक घेणार

Special Article | Welcome to Indore : इंदौर हे देशातलं सगळ्यात स्वच्छ शहर का आहे?

 

Indore Municipal Corporation | (Author: Ganesh Mule) | काही शहरं तुम्हांला बघता क्षणी प्रेमात पाडतात. काही शहरांच्या प्रेमात तुम्ही आधीपासूनच असता. मला बघता क्षणी इंदौर शहरानं प्रेमात पाडलं. तर पुण्याच्या प्रेमात मी बऱ्याच वर्षांपासून आहे. मुंबईनं मात्र मला कधी प्रेमात पाडलं नाही. बघता क्षणी तर आधी भीतीच वाटली. एवढं सांगायचं कारण म्हणजे पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीने आयोजित अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने नुकतंच इंदौर शहराला भेट दिली. दोन दिवस आणि दोन रात्रीत बऱ्यापैकी शहर फिरून घेतलं. देश के सबसे स्वच्छ शहर (The Cleanest City of India) में आपका स्वागत हैं. असं म्हणून इंदौर शहरात तुमचं प्रत्येक ठिकाणी स्वागत केलं जातं. (PMC | IMC)
शहरात रात्रीच उतरलो. उतरल्याबरोबर नजरेत भरली ती त्या शहराची स्वच्छता. खरं म्हणजे स्वच्छतेबाबत या शहरानं स्वतःची जेवढी branding आणि जाहिरात केलीय, तसंच ते आहे. जाहिरात आणि वास्तवता यात फरक असतो. मात्र इथं तसं काही दिसलं नाही. जशी जाहिरात अगदी तसंच शहर स्वच्छ आहे. रात्र आणि दिवसा देखील तशीच स्वच्छता. रस्ते देखील सुटसुटीत. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला शिवाय डिव्हायडर मध्ये देखील झाडांचं प्रमाण म्हणावं तेवढं चांगलं. त्यामुळे शहरात पाऊल ठेवल्याबरोबर शहरानं स्वच्छतेबाबत भ्रमनिरास केला नाही. रस्ते आणि परिसर तर स्वच्छ होताच. मात्र फ्लेक्स आणि होर्डिंग च्या बाबतीत देखील शहर स्वच्छ दिसलं. जमीन आणि आकाश असं दोन्हीवर देखील शहरानं स्वच्छता टिकवून ठेवलीय. जी इतर शहरात क्वचितच पाहायला मिळते.
मात्र शहराला सकाळी लवकर जाग येत नाही. सकाळी स्वच्छता कर्मचारी किंवा इतर दूध किंवा कामाचे लोकच तेवढे बाहेर दिसतात. दोन दिवसात जाणवलं कि शहर रात्री खूप वेळ जागं असतं. त्यामुळे कदाचित सकाळी जाग यायला उशीर होत असावा. हिंदी भाषिक असणारं हे शहर. सुखवस्तू असल्यासारखं. आहे त्यात समाधान मानण्याची लोकांची वृत्ती दिसून येतीय. फार महत्वाकांक्षा ठेऊन ऊर फुटेस्तोर धावपळ करायची नाही. आपल्या परंपरांना गालबोट लागू द्यायचं नाही. एवढी शांत वृत्ती लोकांची दिसून आली. युवकांमध्ये आक्रमकपणा दिसला पण तो तसा सगळीकडे असायचाच. बायका आणि पुरुष दोघेही दिसण्याबाबत अगदी सुंदर. गोरेगोमटे. देवी अहिल्याबाई आणि मल्हारराव होळकर जी परंपरा सोडून गेले ती अजूनही या लोकांनी जपल्यासारखी वाटते. इथल्या लोकांना आपल्या शहराविषयी प्रचंड अभिमान. त्यात स्वच्छतेच्या बाबतीत तर विचारायलाच नको. नुसता अभिमानच नाही तर लोक स्वच्छता टिकवण्यासाठी हातभार लावत असतात. एकतर लोक स्वतः कचरा करत नाहीत. आणि झाला तरी तात्काळ कचरा उचलण्याचं काम लोक करतात. मग ते दुकानदार असो कि सर्वसामान्य माणूस.  असं चित्र खूपच कमी शहरात दिसतं. असं असलं तरी शहराला महत्वाकांक्षेचे धुमारे फुटण्याची आवश्यकता आहे. ज्यामुळे शहरात उद्योग आणि आयटी सारख्या गोष्टीना चालना मिळेल आणि इथल्याच लोकांना रोजगार मिळेल.
दुसरी महत्वाची नजरेत भरणारी गोष्ट म्हणजे इथल्या व्यवस्थेत राजकीय हस्तक्षेप मात्र खूप कमी दिसतोय. हे सर्वांच्याच बोलण्यातून दिसून येत होतं. आणि वास्तव परिस्थिती देखील तशीच दिसून आली. इंदौर महापालिकेचा आयुक्त हा इथला प्रमुख आहे. म्हणजे पोलिसांपेक्षाही जास्त अधिकार. पोलिसांना कमी आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना इथली लोकं जास्त घाबरतात. ही देखील विरळ अशी गोष्ट आहे. 30 लाख लोकसंख्येचं शहर. जिथे दररोज 850-900 मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. त्यासाठी महापालिकेच्या एकूण 20 हजार कर्मचाऱ्यांपैकी 10 हजार कर्मचारी हे घनकचरा विभागाचं काम करतात. घनकचरा विभागानं कचरा प्रक्रियांचे बरेच प्रोजेक्ट हाती घेतले आहेत. विज निर्मिती पासून ते CNG गॅस निर्माण करण्याचं काम कचऱ्यापासून होताना दिसतंय. जेवढा कचरा तयार होतोय त्यापेक्षा जास्त क्षमतेचे प्रकल्प इंदौर महानगरपालिकेकडे आहेत. ही महापालिकेची जमेची बाजू असल्याने महापालिका गेली पाच वर्ष देशात स्वच्छतेचा पहिला क्रमांक पटकावत आलीय. महापालिकेचं काम देखील याबाबतीत खरंच वाखाणण्याजोगं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे इंदौर महापालिकेनं शहरातील लोकांना स्वच्छता राखण्याची सवय लावलीय.
अर्थातच या झाल्या शहराच्या जमेच्या बाजू. काही गोष्टीत मात्र सुधारणेला नक्कीच वाव आहे. कारण शहर स्वच्छ दिसत असलं तरी ओव्हरहेड केबलनं मात्र शहराला विद्रुप करून टाकलंय. याबाबत महापालिकेला Duct करून underground cabling करायला हवंय. वाहतूक देखील फार सुरळीत आहे असं नाही. त्यावर देखील काम होऊ शकतं. तसंच शहरातून दोन नद्या वाहतात. मात्र त्यांचं देखील प्रदूषण दिसून येतं. जलशुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून पाणी शुद्ध करून नदीत सोडलं जातं असं महापालिका सांगत असली तरी त्यावर विश्वास बसत नाही.
असं असलं तरीही पुणे आणि इंदौर या शहरांची तुलना मात्र होऊ शकत नाही. कारण सर्वच बाबतीत ही शहरं वेगळी आहेत. इंदौर छोटं तर पुणे हे 70 लाखाच्या आसपास लोकसंख्या असलेलं शहर. पत्रकार म्हणून पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) काम करत असताना लक्षात आलं कि  इंदौर पेक्षा जास्त काम पुणे महापालिका आपल्या शहरात करतीय. कचरा प्रकल्प देखील भरपूर आहेत. मात्र जाहिरात करण्यात पुणे महापालिका मागं पडतीय. होर्डिंग बाबत देखील महापालिकेकडून म्हणाव्या तशा उपाययोजना होत नाहीत. पुण्याकडं जसं देशभरातील लोकांचा ओढा असतो तसा तो इंदौर (Indore Municipal Corporation) कडे नक्कीच नाही. त्यामुळे तुलना हा विषय दोन्ही महापालिकेत येऊच शकत नाही. मात्र इंदौर महापालिकेने जसं पुणे महापालिकेकडून काही गोष्टी शिकून घेतल्या तशा पुणे महापालिकेला देखील बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडून शिकता येतील. सर्वात महत्वाचं म्हणजे पुणेकरांनी महापालिकेच्या उपक्रमात सहभागी व्हायला हवीय. त्यांना साथ द्यायला हवीय. तसंच महापालिकेच्या इतर विभागानी देखील घनकचरा विभागाला साथ द्यायला हवीय. असं झालं तर महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमनार, घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांच्या नेतृत्वात नक्कीच पुणे महापालिका देखील स्वच्छते बाबत देशात पहिला क्रमांक पटकावेल. तशी आशा करायला काही हरकत नाही.
——-