Sinhgadh Road Flyover | सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या तिसऱ्या टप्प्याचे उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण!
Pune Flyover – (The Karbhari News Service) – पुणे शहरात सिंहगड रस्त्यावर स्वामिनिष्ठ शिवरक्षक वीर शिवाजी काशिद चौक ते विनोदमूर्ती कै.प्रकाश विठ्ठल इनामदार चौक पर्यंत उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते उद्या म्हणजे १ सप्टेंबर रोजी, दुपारी ०३.०० (तीन ) वाजता, स्वामिनिष्ठ शिवरक्षक वीर शिवाजी काशिद चौक , सिंहगड रो येथे करण्यात येणार आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (Pune Municipal Corporation – PMC)
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांची उपस्थिती असणार आहे.
महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सिंहगड रस्ता येथील राजाराम पुलापासून ते फन टाईम थिएटर पर्यंत उड्डाणपूल विकसित करण्यात आला आहे. पुणे शहर हे महाराष्ट्रातील सर्वात वेगाने वाढणारे महानगर असून, दरवर्षी सुमारे ३ लाख वाहनाची भर पडत आहे. अशा परिस्थितीत वाहतूक कोंडी ही शहराच्या दैनंदिन जीवनातील सर्वात मोठी समस्या ठरत आहे. सिंहगड रस्त्यावरून धायरी, नन्हे, खडकवासला, वडगाव बुद्रुक, नांदेड सिटी, तसेच बेंगळुरू- मुंबई राष्ट्रीय महामार्गाशी जोडणाऱ्या या रस्त्यावरून दररोज सुमारे १.५ लाखापेक्षा जास्त वाहनांची वाहतूक होते. सिंहगड रस्त्याच्या एका बाजूला मुठा नदी व दुसऱ्या बाजूस डोंगर असल्यामुळे पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्यामुळे उड्डाणपूल निर्माण करणे गरजेचे भासले. सिंहगड रस्त्यावरील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी पुणे महानगरपालिकेमार्फत उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. उड्डाणपूल हा पुणे शहरातील सर्वात मोठा उड्डाणपूल असून, तीन टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात आला.
प्रथम टप्प्यात सिंहगड कडून स्वारगेटला जाणारा ५२०.०० मी. लांबीचा राजाराम पूल चौकातील एकेरी उड्डाणपूल. (खर्च र.रु.१५.०० कोटी) दुसऱ्या टप्प्यातील विठ्ठलवाडी ते फन टाईम थिएटर पर्यंतचा स्वारगेट कडून सिंहगड कडे जाणारा २.१ किमी लांबीचा उड्डाणपूल. (खर्च र.रु.६१.०० कोटी) तिसऱ्या टप्प्यातील स्वामिनिष्ठ शिवरक्षक वीर शिवाजी काशीद चौक ते विनोदमुर्ती कै.प्रकाश विठ्ठल इनामदार चौक पर्यंतचा सिंहगड कडून स्वारगेटला जाणारा १.५ किमी. लांबीचा उड्डाणपूल. (खर्च र.रु.४२.०० कोटी)
असा उड्डाणपुलासाठी एकूण ११८.३७ कोटी खर्च आला आहे.
राजाराम पुलापासून ते फन टाईम थिएटर दरम्यानच्या २.६ किमी लांबी मध्ये ६ चौक (सिग्नल) ओलांडून प्रवास करण्यासाठी सुमारे ३० मिनिटे कालावधी लागत होता, सदर उड्डाणपुलामुळे आता वाहतुकीसाठी लागणारा वेळ सुमारे ५-६ मिनिटांवर आलेला आहे. पुलाखालील रस्त्याचे विकसन योग्य प्रकारे केल्यामुळे, दोन्ही बाजूस सुमारे ३ लेन वाहतुकीसाठी उपलब्ध होऊन, प्रशस्त पदपथासाहित पार्किंगची सुविधा देखील उपलब्ध झाली आहे. सदर २.६ किमी लांबी मधील दुभाजकाचे सुशोभीकरण CSR अंतर्गत २ एजन्सी मार्फत बहुतांशी काम पूर्ण करण्यात आले असून, त्याची देखभाल पुढील ५ वर्ष त्यांच्या मार्फत करण्यात येणार आहे. उड्डाणपुलाचा पहिला टप्पा दि.१५/०८/२०२४ रोजी व दुसरा टप्पा दि. ०१/०५/२०२५ रोजी नागरिकांना वाहतुकीस खुला करून देण्यात आला आहे. उद्या तिसऱ्या टप्प्यासाहित संपूर्ण प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

COMMENTS