शिवजयंती मिरवणुकीला परवानगी द्यावी : महापौरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
: शिवजयंती उत्सव समिती, पोलीस अधिकारी, महापालिका अधिकाऱ्यांची बैठक
पुणे : कोरोना संकटामुळे गेली दोन वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यास सलग दोन वर्षे बंधने आल्याने यंदाचा शिवजयंती उत्सव(Shivjayanti) जल्लोषात साजरा व्हावा, असा सूर शिवप्रेमींकडून उमटला असून या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शिवजयंती उत्सवाच्या मिरवणुकीला परवानगी द्यावी, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ(Mayor Murlidhar Mohol) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackrey) यांच्याकडे केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर महापौर मोहोळ यांनी शिवजयंती साजरी करण्याच्या नियोजनाची बैठक घेतली. या बैठकीस पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, विरोधीपक्ष नेत्या दीपाली धुमाळ यांच्यासह शिवजयंती उत्सव समितीचे, प्रतिनिधी, महापालिका अधिकारी यांची उपस्थिती होती.
याबाबत माहिती देताना महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कशा पद्धतीने साजरी केली जावी? यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. कोरोना महामारीच्या दोन वर्षाच्या काळातील निर्बंधांमुळे शिवजयंतीचा उत्सव साजरा करताना मर्यादा आल्या, अशा भावना शिवप्रेमींनी व्यक्त केल्या होत्या. शिवजयंती उत्सवासाठी आवश्यक अटी आणि शर्थी घालून देऊन राज्य सरकारने मिरवणुकीला परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. राज्यशासनाच्या नियमावलीत मिरवणुकीच्या परवानगीचाही समावेश असावा, अशी भूमिका आहे’
शिवजयंती साजरी करण्यासंदर्भात विविध मुद्द्यांवर चर्चा !
◆ मिरवणुकीच्या स्वागतासाठी महापालिकेचा स्वागत कक्ष असणार
◆ पुणे शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्व पुतळ्यांना विद्युत रोषणाई करण्यात यावी.
◆ मिरवणुकीचे परवाने हे ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार
◆ पुणे शहरातील सर्व शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात.
◆ शिवजंयती महोत्सवासाठी रथयात्रा आणि मिरवणूक यासाठी स्थानिक पोलीस विभागाने लवकरात लवकर बैठका घेऊन आवश्यक त्या परवानग्या द्याव्यात.
◆ शिवजयंतीबाबत काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीकरिता राज्य शासनाकडून नियमावली लवकरात लवकर जाहीर करावी.
◆ पुणे शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मानवंदना देण्यासाठी येणार्याा नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच फिरत्या शौचालयाची व्यवस्था करणे.
◆ मिरवणुका निघणाऱ्या मार्गांवरील खड्डे बुजविण्यात यावे, रस्त्यावरील राडारोडा उचलण्यात यावा, अडथळा निर्माण करणाऱ्या झाडांच्या फांद्या कापण्यात याव्यात.
COMMENTS