Shaskiy Adhikari Marathi Sahitya Sammelan | पहिले राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन पुण्यात!| पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले स्वागताध्यक्ष !
| मराठी भाषा संवर्धन समिती, पुणे महानगरपालिका आणि संवाद, पुणे तर्फे दि. २० ते दि. २२ डिसेंबर दरम्यान आयोजन !
| यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड संमेलनाध्यक्ष तर पुणे महापालिकेचे आयुक्त
राजेंद्र भोसले स्वागताध्यक्ष !
Pune PMC News – (The karbhari News Service) – मराठी भाषा संवर्धन समिती, पुणे महानगरपालिका आणि संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचे शुक्रवार २० ते रविवार, २२ डिसेंबर २०२४ या कालावधीत पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये कार्यरत असलेले वरिष्ठ अधिकारी विविध परिसंवाद, चर्चासत्रे, कविसंमेलनातून व्यक्त होणार असून आजी-माजी अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे, चित्र-छायाचित्रांचे प्रदर्शन, नव्या पुस्तकांचे प्रकाशन, कथाकथन असे विविध कार्यक्रम संमेलना दरम्यान आयोजित करण्यात आले आहेत.
यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले स्वागताध्यक्ष आहेत. संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन संमेलनाचे निमंत्रक आहेत. तीन दिवसीय संमेलनानिमित्त आयोजित कार्यक्रम बालगंधर्व कलादालनात तर संमेलनाचा उद्घाटन समारंभ बालगंधर्व रंगमंदिरात दिनांक २१ डिसेंबर २०२४ वार शनिवार सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. संमेलन सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने वरिष्ठ व सनदी अधिकारी यांना ऐकण्याची व भेटण्याची नामी संधी अधिकारी-कर्मचारी, नागरिक आणि पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्याला साहित्यिक व सांस्कृतिक परंपरेचा मोठा वारसा लाभला आहे. गेल्या शतकामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मराठी साहित्यात अतिशय मोलाची भर टाकली आहे. सध्या राज्याच्या प्रशासनात जवळपास १८ लाख अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी काही अधिकारी-कर्मचारी हे त्यांचे शासकीय कामकाज सांभाळून साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने योगदान देत आहेत. तसेच अनेक शासकीय अधिकारी-कर्मचारी यांना या क्षेत्रांमध्ये राष्ट्रीय व राज्य पातळीवरील मानाचे पुरस्कार सुध्दा मिळालेले आहेत.
मराठी भाषेला नुकताच केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. तसेच राज्य शासनाने मराठी भाषा धोरण देखील नुकतेच जाहिर केले आहे. प्रशासनात व लोकव्यवहारात मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, विकास, जतन व संवर्धन होण्यासाठी पुढील काळात सर्वच स्तरावर व्यापक व विस्तृत प्रयत्न होणे आवश्यक आहे. प्रशासकीय अधिकारी यांचे लेखन साहित्य समाजापुढे यावे, त्यांना लेखनासाठी प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे तसेच मराठी भाषेच्या विकासात व संवर्धनात प्रशासनातील अधिकाऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग वाढावा अशी उदिष्टे विचारात घेवून हे राज्यस्तरीय अधिकाऱ्यांचे साहित्य संमेलन पुणे महानगरपालिकेच्या मराठी भाषा संवर्धन समिती व संवाद पुणे मार्फत आयोजित करण्यात आले आहे.
पुणे महानगरपालिकेकडून या साहित्य संमेलनाची पूर्व तयारी सुरू करण्यात आली असून त्या अनुषंगाने कामकाजाच्या सूचना संबंधित विभागास देण्यात आल्या आहेत. तसेच या संमेलनसाठी मराठी भाषा संवर्धन समिति अंतर्गत संमेलन समन्वय समिती तयार करण्यात आली असून या समन्वय समितीमध्ये पुणे महानगरपालिका प्रशिक्षण प्रबोधिनीचे उपायुक्त राजीव नंदकर, शिक्षण विभागाच्या उपायुक्त आशा राऊत आणि शिक्षण अधिकारी माध्यमिक आशा उबाळे यांचा समावेश आहे.
शुक्रवार, दि. २० डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता पुस्तक प्रदर्शन, पुस्तक प्रकाशन व चित्र व छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून या प्रसंगी यशदाचे महासंचालक निरंजन सुधांशू, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. सहकार आयुक्त दीपक तावरे, निवृत्त आयएएस अधिकारी अनिल कवडे, यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल, लोकमान्य मल्टिपर्पज क्रेडिट सोसायटीचे सुनील जाधव, डॉ. राजाराम घावटे, राजगंगा बायोरिफायनरी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
संमेलनाचा मुख्य उद्घाटन समारंभ शनिवार, दि. २१ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला असून माजी मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, अविनाश धर्माधिकारी, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, निवृत्त आयएएस अधिकारी विश्वास पाटील, नॅशनल बुक ट्रस्टचे विश्वस्त राजेश पांडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
उद्घाटन सत्रानंतर सकाळी ११:४५ वाजता अधिकाऱ्यांसाठी साहित्य लेखनातील आव्हाने’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, निवृत्त आयएएस अधिकारी भारत सासणे, निवृत्त आयएएस अधिकारी विश्वास पाटील, निवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रल्हाद कचरे यांचा सहभाग आहे. दुपारी २ वाजता इतर राज्यातील प्रशासकीय कार्यसंस्कृती व अनुभव’ या विषयावर आयोजित परिसंवाद अतिरिक्त महासंचालक महेश भागवत (तेलंगणा), महापालिका आयुक्त राजेश पाटील (भुवनेश्वर, ओडिसा), आयएएस अधिकारी आनंद पाटील, जीएसटी प्रधान आयुक्त सुरेंद्र मानकोसकर (गुजरात), निवृत्त आयएएस अधिकारी विशाल सोळंकी, आयआरटीएस सुशील गायकवाड, आयपीएस अधिकारी संतोष चाळके यांचा सहभाग असणार आहे. ‘प्रशासनातील लक्षवेधी साहित्यनिर्मिती’ या विषयावर दुपारी ३:१५ वाजता परिसंवाद आयोजित करण्यात आला असून यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, निवृत्त आयएएस अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, निवृत्त सहसंचालक श्रीकांत देशमुख, साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव मिनाक्षी पाटील, पुणे महापालिकेचे उपायुक्त राजीव नंदकर यांचा सहभाग असणार आहे.
संमेलनाच्या पहिल्या दिवसाचा समारोप बहुभाषिक कविसंमेलनाने होणार आहे. दुपारी ४:३० वाजता आयोजित कविसंमेलनात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य दिलिप पांढरपट्टे, अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंग, जीएसटी अतिरिक्त आयुक्त वैशाली पतंगे, अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, यशदाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. किरण धांडे, उपजिल्हाधिकारी गणेश मरकड, मनिषा कुंभार, अतिरिक्त जिल्हाधिकारी रुपाली आवळे- डंबे, मंत्रालयातील उपसचिव लिना संख्ये, उपजिल्हाधिकारी वैशाली राजमाने यांचा सहभाग असणार आहे.
रविवार, दि. २२ रोजी सकाळी १० वाजता ‘कृत्रिम बुद्धिमत्ता, प्रशासन व साहित्य’ या विषयावरील परिसंवादात वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. विकास गरड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ओमप्रकाश यादव, नगर भूमापन उपसंचालक डॉ. राजेंद्र गोळे, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, भूमापन उपसंचालक कमलाकर हट्टेकर यांचा सहभाग असणार आहे. सकाळी ११ वाजता ‘प्रशासनात बदलत गेलेली भाषा’ या परिसंवादात यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर, बालभारती, किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांचा सहभाग असणार आहे.
दुपारी १२ वाजता आयोजित ‘माझे वाचन’ या सत्रात निवृत्त आयएएस अधिकारी महेश झगडे, निवृत्त आयएएस अधिकारी सुनील पाटील, स्मार्ट प्रकल्पाचे संचालक डॉ. हेमंत
वसेकर, अतिरिक्त जमाबंदी आयुक्त आनंद भंडारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड व्यक्त होणार आहेत. ‘शासनात घडणारे विनोद’ या विषयावर दुपारी २ वाजता अयोजित सत्रात यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डिकर, निवृत्त आयएफएस अधिकारी रंगनाथ नाईकडे, निवृत्त आयएएस अधिकारी चिंतामण जोशी, निवृत्त कृषी उपसंचालक नाथा राणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद खामकर बोलणार आहेत.
‘चांगला साहित्यिक कार्यक्षम अधिकारी नसतो का?’ या दुपारी ३:१५ वाजता आयोजित सत्रात जीएसटी, अतिरिक्त आयुक्त वैशाली पतंगे, आयकर उपायुक्त महेश लोंढे, राज्य मराठी विकास संस्थेचे उपसंचालक अंजली ढमाळ, उप आयुक्त जीएसटी डॉ. उल्का नाईक-निंबाळकर, महापालिका उपायुक्त राजीव नंदकर, व्यक्त होणार आहेत. दुपारी ४:३० वाजता कथाकथन सत्र आयोजित करण्यात आले असून यात जीएसटी उपायुक्त राजा गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सोनाली हरपळे-घुले यांचा सहभाग असणार असून सत्र संचालन डॉ. किरण धांडे करणार आहेत.
तीन दिवसीय संमेलनाचा समारोप समारंभ सायंकाळी ५:१५ वाजता आयोजित करण्यात आला,mअसून यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त भारत सासणे, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त माजी सह जिल्हा निबंधक श्रीकांत देशमुख, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त निवृत्त आयएएस अधिकारी विश्वास पाटील, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त तहसीलदार आबा महाजन, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटचे चेअरमन डॉ. संजय चोरडिया, भारत विकास ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक हनुमंत गायकवाड यांचा सहभाग असणार आहे.
या संमेलनासाठी संयोजन समिती तयार करण्यात आली असून तिच्यामध्ये राजीव नंदकर, जेष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख, आनंद भंडारी, वैशाली पतंगे, सचिन इटकर, आशा राऊत, सुनील बल्लाळ, आशा उबाळे, वसंत म्हस्के, युवराज देशमुख, मनीषा शेकटकर, संतोष पाटील, राजेंद्र पवार, निकिता मोघे, किरण केंद्रे आणि किरण धांडे यांचा समावेश आहे. या साहित्य संमेलनात राज्यातून\ जास्तीत जास्त प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी, नागरिक तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आणि शालेय विद्यार्थी यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन पुणे महापालिकेचे आयुक्त तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष राजेंद्र भोसले यांनी केले आहे.
COMMENTS