छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाला मंजुरी
वढू बुद्रुक येथे भव्य स्वरूपात उभारणी होणार
पुणे : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे पुणे जिल्ह्यातील वढू बुद्रुक (ता. हवेली) येथे स्मारक उभारणीच्या कामाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (दि. २०) तत्त्वतः मंजुरी दिली आहे.
छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारे, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे, भव्यदिव्य असले पाहिजे. या स्मारकाच्या आराखड्यासाठी स्पर्धेचे आयोजन करून त्यातून सर्वोत्कृष्ट आराखड्याची निवड करण्यात यावी. स्मारकाचे काम करताना स्थानिकांशी चर्चा करून, त्यांना विश्वासात घेऊन काम करण्याच्या सूचनाही अजित पवार यांनी दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुढाकार
मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात स्मारकाच्या उभारणीबाबत अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव प्रशांत नवघरे तसेच ‘व्हीसीद्वारे पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, वढूचे माजी सरपंच अनिल शिवले, अंकुश शिवले उपस्थित होते.
COMMENTS