River Linking Project | भविष्यातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी लवकरच देशातील २० नद्या एकमेकांशी जोडणार – केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील
Naam Foundation – (The Karbhri News Service) – प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्यासाठी केंद्र शासन ‘हर घर जल’ राबवित आहे. पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जमीनीत मुरवणे आवश्यक आहे. भविष्यातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी पाण्याचा पुनर्वापर करावा. देशातील लोकसंख्या, पशुधन, शेती यांना पाण्याची पुरेशी उपलब्धता असावी यासाठी पुढील दोन महिन्यात देशातील २० नद्या एकमेकांशी जोडण्यात येणार, असे प्रतिपादन केंद्रीय जलसंसाधन मंत्री सी. आर. पाटील यांनी केले.
गणेश कला क्रीडा मंच येथे नाम फाउंडेशनच्या ९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, सुरतच्या आमदार संगीता पाटील, नाम फाउंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर, संस्थापक मकरंद अनासपुरे उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री श्री. पाटील म्हणाले, ‘हर घर जल’ योजनेमुळे महिलांची पाण्यासाठीची भटकंती थांबली. देशातील महिलांचे दररोजचे साडेपाच कोटी तास वाचले आहेत. त्या वेळेचा उपयोग आर्थिक स्वावलंबनासाठी होऊ लागला आहे. शुद्ध पाणी घरी आल्यामुळे जलजन्य आजार कमी होऊन औषधावरील खर्च कमी झाला. जलसंधारणाच्या अनेक योजनांना गती देण्यात येत आहे. यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगला प्राधान्य देण्यात आले आहे. जगाच्या १८ टक्के लोकंसख्या भारतात आहे. या तुलनेत स्वच्छ व पिण्यालायक पाणी केवळ ४ टक्के उपलब्ध आहे. भविष्यात देशातील लोकसंख्या, पशुधन, शेती यांना पाण्याची पुरेशी उपलब्धता असावी यासाठी पुढील दोन महिन्यात देशातील २० नद्या एकमेकांशी जोडण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला पर्याप्त पाणी उपलब्ध होऊ शकेल. पाण्याची कमतरता भरुन काढण्यासाठी सर्वतोपरी कामे सुरु आहेत. यास समाजाचाही पाठिंबा आवश्यक आहे. पुढील काळात प्रत्येक घरावर रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्यात येईल. भावी पिढीला पाण्याची कमतरता भासू नये यासाठी सर्वांच्याच प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे. नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून होत असलेले काम यादृष्टीने अत्यंत प्रशंसनीय आहे.
जलयुक्त शिवार योजना यशस्वी करण्यामध्ये ‘नाम’ फाउंडेशनचा मोठा वाटा -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नाम फाउंडेशनने राज्यातील सर्वाधिक दुष्काळी भागात परिवर्तन घडवून आणले. जलयुक्त शिवार योजना यशस्वी करण्यामध्ये नाम फाउंडेशनचा मोठा वाटा आहे. देशातील सर्वांत जास्त मोठी धरणे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील ५५ टक्के भाग अवर्षणप्रवण आहे. महाराष्ट्रातील पाणी समस्येवरील उपाय शोधण्यासाठी जलयुक्त शिवार कार्यक्रमाची शासनाने आखणी केली. या कार्यक्रमाला नाम फाऊंडेशनने लोकचळवळीत रुपांतरीत केले.
ते म्हणाले, नाम फाउंडेशनने एक हजार पेक्षा जास्त गावांमध्ये वेगवेगळी कामे केली. दुष्काळी भागातील जलसंधारणाची कामे, शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण, मुलींचे लग्न, महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचे काम त्यांनी केले. सर्वसामान्यांची दुःखे आत्मसात करुन नाम कार्य करत आहे. महाराष्ट्रात जोपर्यंत जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर होणार नाहीत, पाण्याचा थेंब न थेंब जोपर्यंत जमिनीत मुरणार नाही, तोपर्यंत शेतकरी आत्महत्या थांबणार नाहीत. हे ओळखून शासनाने जलयुक्त शिवार ही योजना प्राधान्याने राबविली. त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी साठवण झाली. अनेक गावे पाणीदार झाली आहेत. जलसंधारणामुळे शेती समृद्ध झाली. हे काम अव्याहत चालणारे असून जलसंधारणाच्या कामाला अधिक गती देण्यासाठी नाम फाउंडेशन सारख्या अन्य संस्थानी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहन श्री फडणवीस यांनी केले.
यावेळी नाम फाऊंडेशनबद्दल बोलताना ते म्हणाले, नाम फाऊंडेशनने लोकांची मानसिकता बदलली. लोकांना पाण्याचे इंजिनिअरिंग शिकविले. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्यात सामान्य माणसाचे दु:ख जगण्याची क्षमता असल्यामुळे अनेक लोक त्यांच्याशी जोडले गेले. त्यांच्या संस्थेचे कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. समाजपरिवर्तन घडवू शकतो हे त्यांनी दाखवून दिले आहे.
नाम फाऊंडेशनचे काम भविष्यातील कार्याला उर्जा देणारे- उद्योगमंत्री उदय सामंत
नाम फाऊंडेशनचे कार्य अत्यंत प्रामाणिक आणि पारदर्शी असून कौतुकास्पद आहे. सामाजिक कार्य करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान असून त्यांचे काम भविष्यातील कार्याला उर्जा देणारे आहे, असे गौदवोद्गार उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काढले.
नाम फाऊंडेशनने विविध क्षेत्रात केलेल्या विधायक आणि पारदर्शी कामाचा आदर्श सर्वांनी घ्यावा. कंपन्यांनी त्यांना मिळणारा सीएसआर फंड सामाजिक उपक्रमांना मोठ्या प्रमाणात द्यावा असे आवाहन श्री. सामंत यांनी केले. यावेळी श्री. सामंत यांच्या हस्ते नाम फाऊंडेशनचे विश्वस्त, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी,एनडीआरएफच्या जवानांचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला सीआरपीएफचे पोलीस उपमहानिरीक्षक श्री. निंबाळकर, नाम फाऊंडेशचे सदस्य मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
COMMENTS