नगर रस्त्यावरील बीआरटी काढा अन वाहतुक कोंडी सोडवा
| आमदार सुनिल टिंगरे यांची लक्षवेधीतून विधानसभेत मागणी
पुणे : नगर रस्ता आणि विश्रांतवाडी रस्त्यावरील बीआरटी (BRTS) मार्गामुळे वाहतुक कोंडीची समस्या(Traffic issue) गंभीर बनली आहे. त्यामुळे हा मार्ग काढून वाहतुक कोंडीची समस्या सोडवा अशी आग्रही मागणी राष्ट्रवादीचे आमदार सुनिल टिंगरे (NCP MLA Sunil Tingre) यांनी विधानसभेत केली. त्यावर याबाबत तज्ञांची समिती नेमून निर्णय घेतला जाईल असे आश्वासन मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी सभागृहात दिले.
वडगाव शेरीचे राष्ट्रवादीचे आमदार सुनिल टिंगरे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून नगर रस्त्यावरील बीआरटी मार्गामुळे होणारी वाहतुक कोंडी आणि अपघातकडे विधानसभेत लक्ष वेधले. यावेळी आमदार टिंगरे म्हणाले, 2006 साली सार्वजनिक वाहतुक सुधारणासाठी बीआरटी योजना राबविण्यात आली. मात्र, नगर रस्ता परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे, अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या, मॉल, आयटी, विमानतळ यामुळे नगर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीला अपुरा पडत आहे. त्यामुळे आता बीआरटी मार्ग काढून टाकावा अशी नागरिकांची मागणी आहे. पोलिसांनीही हा मार्ग काढण्याची सुचना महापालिकेला केली असून महापालिकाही सकारात्मक आहे. ज्या प्रमाणे मुख्यमंत्र्यांनी चांदणी चौकातील वाहतुक कोंडीचा प्रश्न मार्गी लावला त्याप्रमाणे नगर रस्त्यावरील बीआरटी बंद वाहतुक कोंडी सोडवावी अशी मागणी आमदार टिंगरे यांनी केली.
दरम्यान आमदार टिंगरे यांच्या प्रश्नांना उत्तर देताना मंत्री उदय सामंत म्हणाले, नगर रस्त्यांवर मेट्रो प्रकल्पाच्या कामांमुळे वाहतुक कोंडी होत आहे. हे काम सहा महिन्यात पुर्ण होईल. बीआरटी योजनेबाबत तज्ञांची समिती नेमून त्यावर निर्णय घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.
शिवणे-खराडी रस्त्याचा प्रश्न सोडवा (Shivne-Kharadi Road)
नगर रस्त्यावरील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी शिवणे-खराडी रस्त्यांसाठी भूसंपादन करून हा प्रश्न सोडवा. तसेच खराडी बायपास, शास्त्रीनगर चौक आणि विश्रांतवाडी येथील उड्डाणपुलांसाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात निधीची तरतुद असूनही या कामांसाठी निविदा प्रक्रिया निघालेली नाही असे सांगत त्यावर मुख्यमंत्र्यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी आमदार टिंगरे यांनी केली.