Rajiv Gandhi Zoo Katraj | राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या तिकीट शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव!
| उद्या स्थायी समितीच्या बैठकीत होणार निर्णय
Pune Katraj Zoo Rates – (The Karbhari News Service) – राजीव गांधी प्राणी संग्रहालयास भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी असणारे शुल्क दर सुधारीत करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे. उद्या होणाऱ्या समितीच्या बैठकीत यावर निर्णय होईल. (PMC Standing Committee)
| २०१८ साली वाढविण्यात आले होते दर
‘राजीव गांधी प्राणीसंग्रहालयास भेट देणाऱ्या पर्यटकासाठीचे प्रचलित शुल्क दर २०१८ साली वाढविण्यात आले होते. तदनंतर तिकीट शुल्क दरात वाढ करण्यात आली नाही. प्राणीसंग्रहालयामध्ये पर्यटकांना दाखवल्या जाणाऱ्या प्राण्यांची संख्या तसेच दिल्या जाणाऱ्या विविध सेवा – सुविधा या बाबींचा विचार करता प्रचलित तिकीट शुल्क त्या प्रमाणात असणे आवश्यक आहे. प्राणीसंग्रहालय देखभाल- दुरुस्ती व नियोजित मास्टर प्लॅननुसार करावयाची प्रकल्पीय कामे याकरिता मोठ्या प्रमाणावर खर्च होत असून यामध्ये भविष्यात वाढ होणार आहे. प्राणीसंग्रहालयाच्या नियोजित मास्टर प्लॅनमध्ये प्रस्तावित केले प्रमाणे प्राणीसंग्रहालयामध्ये झेब्रा, पिसोरी हरीण, लायन टेल्ड मकाक या प्रजातीसाठी नवीन प्रदर्शनी, नवीन सर्पोद्यान उभारणी इ. प्रकल्पीय कामे प्रगतीपथावर आहेत. चालू आर्थिक वर्षात मॉर्मोसेट, टॅमरिंन, रानकुत्रा या प्रजातीसाठी प्रदर्शनी उभारणी इ. विकास कामे प्रस्तावीत आहेत. तसेच प्राणी संग्रहालयास भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत असलेने नागरिकांना आधुनिक विविध सेवा – सुविधा उपलब्ध करून देणेकरीता भविष्यात मोठ्या प्रमाणात महसुली खर्च करावा लागणार आहे. असे प्रस्तावात म्हटले आहे.
| उत्पन्नापेक्षा प्राणीसंग्रहालयाचा वार्षिक खर्च अधिक
प्राणीसंग्रहालय येथील प्राण्यांचे दैनंदिन आहार, कायम व ठेकेदार सेवक वेतन खर्च, खंदक देखभाल दुरुस्ती खर्च व नियोजित विकास कामासाठी येणारा खर्च इ. बाबींचा विचार करिता पुणे म.नं.पा. कडे जमा होणाऱ्या उत्पन्नापेक्षा प्राणीसंग्रहालयाचा वार्षिक खर्च हा मोठ्या प्रमाणात होत असून त्यामध्ये भविष्यात प्रचंड वाढ होणार आहे. भारतातील अन्य प्राणीसंग्रहालयाच्या तिकीट शुल्काच्या तुलनेत राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात सध्या आकारण्यात येणारे तिकीट शुल्क हे अल्प आहे. यास्तव राजीव गांधी प्राणीसंग्रहालयांच्या प्रचलित शुल्क दरात उचित वाढ करणे संयुक्तिक राहील. तिकीट शुल्कात वाढ केल्यास प्राणीसंग्रहालयाच्या महसुली उत्पनात वाढ होऊन प्राणी संग्रहालय स्वयंपूर्ण होऊ शकेल. यावर स्थायी समिती सभेत प्राणीसंग्रहालय शुल्क वाढीबाबत सविस्तर चर्चा झालेली आहे.
| असे असतील दर
| प्राणीसंग्रहालय प्रवेश सुविधा
प्रौढ – (उंची ४ फुट ४ इंच व त्यापुढे) – प्रचलित दर होता ४० रुपये, तो आता ५० रुपये प्रस्तावित करण्यात आला आहे.
लहान मुले (३ वर्षाखालील मोफत) – १० रुपयावरून २० रुपये प्रस्तावित करण्यात आला आहे.
विदेशी नागरिकांसाठी १०० रुपयावरून १५० प्रस्तावित करण्यात आला आहे. अंध आणि अपंग यांना मोफत प्रवेश असणार आहे.
खाजगी शाळातील विद्यार्थ्यांना १० वरून २० रुपये प्रस्तावित करण्यात आला आहे.
मनपा शाळा, जिल्हा परिषद व शासकीय शाळातील विद्यार्थी – प्रचलित दर ५ होता तो आता १० रुपये प्रस्तावित करण्यात आला आहे.
| वाहन सुविधा
प्रौढांसाठी ४० होता तो ५० रुपये प्रस्तावित करण्यात आला आहे.
लहान मुलांसाठी २५ होता तो ३० रुपये प्रस्तावित केला आहे.
| कॅमेरा वापर सुविधा बाबत दर बदलले नाहीत. ते तसेच ठेवण्यात आले आहेत.
स्टील कॅमेरा – ५० तर विडीओ कॅमेरा २०० रुपये असा दर असणार आहे.

COMMENTS