Rajiv Gandhi Zoo | राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातील चितळ प्राण्यांना विषाणुजन्य आजाराचे संक्रमण
Katraj Zoo – (The Karbhari News Service) – राष्ट्रीय लाळ खुरकत संशोधन केंद्र यांच्याकडून प्राप्त अहवालानुसार राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातील वन्य प्राण्यांना लाळ खुरकत या विषाणुजन्य आजाराचे संक्रमण झालेचे निदान झालेले आहे. अशी माहिती उद्यान विभागाच्या वतीने देण्यात आली. (PMC Garden Department)
राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात १६ चितळ प्राण्यांच्या मृत्यु झालेला होता. मृत चितळांच्या मृत्युच्या निदानाकरिता विविध शासकिय संस्थाना समाविष्ट करण्यात आलेले होते. मृत प्राण्यांचे शवविच्छेदन करून जैविक नमुने संकलित करण्यासाठी का.ना.पा. पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ व विभागीय रोग अन्वेशन प्रयोगशाळा पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडील तज्ञांच्या चमुला पाचारण करण्यात आलेले होते. त्यांनी संकलित केलेले जैविक नमुने राष्ट्रीय लाळ खुरकत संशोधन केंद्र, भुवनेश्वर, ओरिसा, भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था, बरेली, विभागीय, वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्र, नागपुर, राष्ट्रीय उच्च सुरक्षा प्राणी रोग शाळा, भोपाळ येथे तपासणीसाठी पाठविले होते. पाठविलेल्या जैविक नमुन्यांपैकी प्राण्यांचे लक्षणे व प्रयोगशाळा तपासणी अहवाल हा भुवनेश्वर येथील प्रयोगशाळेतुन प्राप्त अहवालानुसार जुळणारा आढळलेला आहे. राष्ट्रीय लाळ खुरकत संशोधन केंद्र यांच्याकडून प्राप्त अहवालानुसार प्राणीसंग्रहालयातील वन्य प्राण्यांना लाळ खुरकत या विषाणुजन्य आजाराचे संक्रमण झालेचे निदान झालेले आहे.
प्राप्त झालेल्या अहवालाच्या अनुषंगाने परिणामकारक साथ रोग व्यवस्थापन करण्यासाठी २५/०७/२०२५ रोजी प्राणीसंग्रहालयासाठी स्थापन करण्यात आलेल्या वन्य प्राणी आरोग्य सल्लागार समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते. बैठकीस क्रांतिसिंह नाना पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विकास वासकर, शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. विश्वासराव साळुंखे, विकृती शास्त्र विभाग प्रमुख डॉ. चंद्रशेखर मोटे, परजीवी शास्त्रविभाग प्रमुख डॉ. प्रशांत पवार, औषध शास्त्रविभाग प्रमुख डॉ. आंबोरे, सूक्ष्मजीवशास्त्रविभाग डॉ. दुषंत मुगळीकर निमंत्रित सदस्य सह आयुक्त पशु संवर्धन डॉ. जी.एम. हुलसुरे उपस्तिथ होते.
तज्ञांच्या निष्कर्षांनुसार चितळ प्राण्यांच्या मृत्यूचे प्राथमिक कारण हे लाळ खुरकत विषाणु संसर्ग असुन अशा विषाणूच्या संक्रामना दरम्यान प्राण्यांची रोग प्रतिकारक क्षमता कमी होते, पावसाळी प्रतिकुल वातावरण असेल तर प्राण्यांची स्ट्रेस पातळी वाढते. त्यामुळे प्राणी मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण अधिक असते. तथापी पुणे मनपाच्या वतीने संबधित क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शासकीय संस्थाना तात्काळ समाविष्ट करत प्राण्यांचे शवच्छेदन करून जैविक नमुने संकलन व देशभरातील विविध प्रयोग शाळांकडून करण्यात आलेली तपासणी या सर्व बाबींमुळे वन्य प्राण्यांची मरतुक अल्प कालावधीत नियंत्रणात आणण्यास यश आल्याचे तज्ञाकडून सांगण्यात आले. सद्यस्थितीत परिस्थिती नियंत्रणात असुन बाधीत प्राण्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. असे उद्यान विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

COMMENTS