‘स्ट्रीट्स फॉर पीपल’मध्ये पुणे शहराची बाजी
– पुणे शहराचा राष्ट्रीय पातळीवर गौरव
– पादचारीपूरक रस्त्यांवर केंद्र सरकारची मोहोर
पुणे : केंद्र सरकारच्या नगरविकास विभागाच्या ‘स्ट्रीट्स फॉर पीपल चॅलेंज’मध्ये पुणे शहराने बाजी मारली असून पादचारीपूरक रस्त्यांसाठीचा हा गौरव राष्ट्रीय पातळीवर झाला आहे. या स्पर्धेअंतर्गत देशातील पहिल्या ११ शहरात पुण्याचा समावेश आहे. या निमित्ताने पुणे शहरात अर्बन स्ट्रीट गाईडलाईन्सअंतर्गत केलेल्या रस्त्यांवर केंद्र सरकारच्या नगरविकास विभागाने मोहोर लावली आहे. पुणे महापालिकेच्या लोकाभिमुख कामाचे आणि रस्त्यांच्या विकासाबाबत गेल्या चार वर्षात सुरु असलेल्या प्रयत्नांचे हे यश असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारच्या नगरविकास विभागाने देशातील ३८ शहरांमधून ११ शहरांची निवड केली असून त्यात पुणे शहराचा समावेश आहे. पुणे शहरात अर्बन स्ट्रीट गाईडलाईन्सअंतर्गत जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, औंध आणि बाणेर भागात पादचारीपूरक रस्त्यांची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे हे रस्ते सर्वच वयोगटातील नागरिकांसाठी उपयोगी ठरत असून या ठिकाणी विविध व्यायाम प्रकारांसह उपक्रमही राबवता येत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे कमी कालावधीत हे रस्ते नागरिकांच्या पसंतीसही उतरले आहेत. या सर्वंकष बाबी लक्षात घेत पुण्याचा गौरव करण्यात आला आहे.
महापौर मुरलीधर मोहोळ यावर अधिक माहिती देताना म्हणाले, ‘गेल्या काही वर्षांपासून आमचे पादचारीपूरक रस्ते करण्यासाठी प्रयत्न सुरु असताना राष्ट्रीय पातळीवर मिळालेल्या कामाच्या पावतीमुळे आमचा कामाचा उत्साह नक्कीच वाढणार आहेत. शिवाय आम्ही शहर विकासाच्या बाबतीत योग्य दिशेने आहोत, हेही सिद्ध होत आहे. आगामी काळात इतर रस्तेही पादचारीपूरक धर्तीवर विकसित करण्याचा आमचा प्रयत्न असून शहरातील सर्व भागात असे १०० किमी लांबीचे रस्ते विकसित करण्याचे ध्येय निश्चित केले आहे. पादचारीपूरक रस्ते करताना आपण नुकताच पादचारी दिन साजरा केला. देशातील आपला हा पहिला प्रयोग देशातील इतर शहारांनीही स्वीकारला.’
COMMENTS