पहिल्या पावसात पुणेकरांची तारांबळ | झाडपडीच्या 30 घटना
पुणे : शहरात शुक्रवारी दुपारी झालेल्या पहिल्या पावसात शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये झाडपडीच्या 30 घटना घडल्या. कर्वे रस्त्यावरील एका रुग्णालयाच्या पाठीमागील बाजुला असलेली भिंत पडल्याने 11 वाहने तर पोलिस आयुक्तालयाच्या परिसरातील झाड कोसळल्यामुळे 25 हून अधिक वाहनांचे नुकसान झाले. काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साठल्याच्याही घटना घडली.
यंदा कडक ऊन्हाळा अनुभवलेल्या पुणेकरांकडून पावसाची आतुरतेने वाट पाहिली जात होती. दरम्यान, शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आल्हाददायक वातावरण निर्माण झाले. पहिल्याच पावसाने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडविल्याचे चित्रही शुक्रवारी दिसुन आले. जोराचा वारा व पावसाच्या मोठ्या सरींमुळे शहराच्या वेगवेगळ्या भागात मोठमोठी झाडे उन्मळुन, तर काही ठिकाणी तुटून पडली. पोलिस आयुक्तालयाच्या परिसरात मोठे झाड कोसळून रस्त्यावर पडले. त्यामुळे संपुर्ण रस्ता काही वेळ बंद राहीला. तर रस्त्याच्याकडेला पार्कींग केलेल्या 20 ते 25 दुचाकींवर झाड पडल्याने त्यांचे नुकसान झाले. याबरोबरच कर्वे रस्त्यावरील सह्याद्री रुग्णालयाच्या पाठीमागील बाजुला असलेली भिंत पडल्याने तेथेही दहा दुचाकी व एक चारचाकी वाहन अडकल्याने त्याचे नुकसान झाले.
दरम्यान, पावसामुळे शहरातील पर्वती शाहू कॉलनी, जीपीओ, पर्वती येथील स्टेट बॅंक कॉलनी, स्वारगेट एसटी कॉलनी, पोलिस आयुक्तालय, भवानी पेठ येथील बीएसएनएलचे कार्यालय, प्रभात रस्ता, औंध येथील आंबेडकर चौक, राजभवन परिसर, गुरुवार पेठेतील पंचहौद, कोंढवा येथील शिवनेरी नगर, एनआयबीएम रस्ता, कात्रज-कोंढवा रस्ता, नवी पेठेतील पत्रकार भवन, राजेंद्र नगर, कोंढवा येथील आनंदपुरा रुग्णालय, कर्वे सह्याद्री हॉस्पिटलच्या मागे सीमा भिंत पडली असून दहा दुचाकी व एक चारचाकी गाडी अडकल्याची माहिती अग्निशामक दलाच्यावतीने देण्यात आली.
दरम्यान, झाडपडीच्या घटना घडलेल्या ठिकाणी अग्निशामक दलाच्या पथकाने तत्काळ पोहचून रस्ता मोकळा करण्यास प्राधान्य दिले. जोरदार पावसामुळे शहराच्या काही भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते. त्यातुन दुचाकी काढताना नागरीकांची तारांबळ उडाली. तर काही ठिकाणी रस्ता निसरडा झाल्याने दुचाकी वाहने घसरून पडण्याच्या घटनाही काही प्रमाणात घडल्या.
COMMENTS