Pune Water Supply | शहरात १५% पाणीकपात! | जलसंपदा मंत्र्यांच्या आदेशानुसार पाटबंधारे विभागाचा महापालिकेला इशारा
| खडकवासला धरणातून महापालिकेचा दैनंदिन पाणीवापर १४८० एमएलडी असताना पाटबंधारे विभाग म्हणतो १७०७ एमएलडी
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पाणीवापर वरून पुणे महापालिका आणि पाटबंधारे विभाग यांच्यातील शीतयुद्ध वाढतच चालले आहे. त्यातच आता जलसंपदा मंत्री यांनी दिलेल्या आदेशानुसार पुणे शहरात १५ टक्के पाणीकपात करण्याचा इशारा पाटबंधारे विभागाने पुणे महापालिकेला दिला आहे. तसेच त्यानुसार नियोजन करण्याचे आदेश देखील महापालिकेला दिले आहेत. भविष्याटी पाणीटंचाई निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महापालिकेची असेल, असे देखील पाटबंधारे विभागाने स्पष्ट म्हटले आहे. मात्र यामुळे महापालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. (Pune Khadakwasla Irrigation Department)
आगामी मान्सूनवर अल निनो आणि आयओडी चा प्रभाव राहणार आहे. त्यामुळे मान्सून मध्ये कमी पाऊस असणार आहे. पिण्याचे पाणी ३१ जुलै पर्यंत पुरण्यासाठी पाणीकपात करावी लागणार आहे. असे जलसंपदा मंत्र्यांनी म्हटले आहे. त्यामुळे पाणी कपात बाबत पाटबंधारे विभागाने महापालिका प्रशासनाला पत्र दिले आहे.
दुसरीकडे महापालिका खडकवासला धरणातून दररोज १४८० एमएलडी इतके पाणी उचलते. मात्र यावरून देखील पाटबंधारे विभागाने अजब दावा केला आहे. पाटबंधारे विभागाने म्हटले आहे की, महापालिका दररोज १७०७ एमएलडी पाणी उचलते. विशेष म्हणजे दररोज च्या पाणीवापर चे अहवाल दोन्ही विभागाला ऑनलाइन पद्धतीने पाठवले जातात. त्यावर ही आकडेवारी आहे. असे असताना देखील पाटबंधारे विभाग दिशाभूल करत असल्याचा आरोप महापालिकेने केला आहे.
महापालिका एकीकडे सांगते कि आम्ही पाटबंधारे विभागाला पाणीवापराचे जास्तीचे पैसे दिले आहेत. असे असताना पाटबंधारे विभाग हे मान्य करायला तयार नाही. दरम्यान नुकतेच महापालिका प्रशासनाने पाणीवापर साठी नवीन करार करण्यासाठी २२ कोटी अनामत रक्कम पाटबंधारे विभागाकडे वर्ग केली आहे. मात्र पाटबंधारे विभागाने ती रक्कम थकीत रकमेत वळती करून घेतल्याचे महापालिका प्रशासनाला कळविले आहे. पाटबंधारे विभागाच्या या भूमिकेने आता महापालिका प्रशासन पुरते पेचात सापडले आहे. थकबाकी बेबी सर्व माहिती राज्य सरकारला कळवून देखील पाटबंधारे विभाग महापालिकेला जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. यावर आता महापालिका वरिष्ठ स्तरावर काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

COMMENTS