Pune University Road | संचेती चौक ते पुणे विद्यापीठ रस्ता दुरुस्तीचे कामे सुरू | पीएमआरडीए महानगर आयुक्तांच्या निर्देशानुसार तातडीने कामे
PMRDA Pune – (The Karbhari News Service) – संचेती चौक (Sancheti Chowk Pune) ते पुणे विद्यापीठ चौकापर्यंतच्या (Pune University Road) रस्ता दुरुस्तीचे काम करण्यात आले. संबंधित रस्त्याची पाहणी करून तातडीने कामे करण्याचे निर्देश पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे (PMRDA Commissioner Dr Yogesh Mhase) यांनी बैठक घेऊन संबंधित यंत्रणेला दिले होते. त्यानुसार रस्ता दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे.
पावसामुळे संचेती चौक ते पुणे विद्यापीठ चौकापर्यंतचा रस्ता खराब झाला होता. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. याची दखल घेत पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी संबंधित यंत्रणेची बैठक घेत स्थळ पाहणी करून तातडीने रस्ता दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पुणे आयटी सिटी मेट्रो लाईन (पीआयटीसीएमआरएल), पीएमआरडीएचे अभियंता यांनी स्थळ पाहणी करून संचेती चौक ते पुणे विद्यापीठ चौकापर्यंतच्या रस्त्याची शनिवारी दुरुस्ती केली. यासह उर्वरित कामे रविवारी करण्यात आली.
संबंधित रस्ता दुरुस्तीची कामे करण्यापूर्वी रस्ता समतल करून त्याची साफसफाई करण्यात आली. यानंतर रस्त्यावरील खड्डे बुजवत डांबरीकरण आणि काँक्रिटीकरण करत संपूर्ण अस्तरीकरण दोन पथकामार्फत करण्यात आले. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त सचिव श्री. मंडपे यांची पीआयटीसीएमआरएलमार्फत नियुक्ती करण्यात आली आहे. पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अभियांत्रिकी विभाग क्रमांक दोन मुख्य अभियंता रिनाज पठाण यांच्या मार्गदर्शनात अधीक्षक अभियंता योगेश कुलकर्णी यांच्या देखरेखीखाली रस्ता दुरुस्तीची कामे करण्यात आली. यासह आगामी काळात आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने कामे करण्यात येणार आहे.
COMMENTS