Pune News | नागपूर चाळ रस्ता नो पार्किंग झोनच्या आदेशाला स्थगिती
| माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या मागणीला यश ; पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली तत्वतः मान्यता
– माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाचे वाहतूक पोलिस उपायुक्तांना निवेदन
Pune News | नागपूर चाळ गल्ली क्रमांक 1 ते गल्ली क्रमांक 4 तसेच एअरपोर्ट रस्त्यावरील पोस्ट ऑफिस चौक ते जेल रोड पोलिस चौकीपर्यंत येरवडा कारागृहाच्या सीमाभिंतीलगत नो पार्किंग झोन (No Parking Zone) करण्याचा आदेश येरवडा वाहतूक विभागाअंतर्गत घेण्यात आलेला होता. हा निर्णय सर्व नागपूर चाळ आणि महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड मधील रहिवासी यांच्यासाठी गैरसोयीचा आहे. सर्वसामान्य नागरिक, इथले व्यावसायिक यांचा जगण्याचा हक्क हिरावणारा निर्णय आहे. त्यामुळे हा निर्णय रद्द करा, अशी मागणी नागपूर चाळ रहिवासी संघाने केली होती. पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे (PMC former Deputy mayor Dr Siddharth Dhende) यांनी हा निर्णय मागे घेण्यासाठी पाठपुरावा केला. या वेळी हा निर्णय मागे घेण्याला तत्वतः मान्यता दिली असल्याचे वाहतूक शाखेच्या वतीने सांगण्यात आले. (Pune News)
वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजकुमार मगर यांची भाजपा शहराध्यक्ष तथा माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेतली. या वेळी हा निर्णय मागे घेत असल्याचे सांगण्यात आले.
या वेळी माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी नगरसेवक आयुब शेख, नागपुर चाळ व्यापारी अशोशियनचे अध्यक्ष किशोर चौरे, सरचिटणीस शाम गुप्ता, ताराचंद जैन, राजु बाफना, यशवंत शिर्के, पथारी संघटना अध्यक्ष विजय कांबळे, अण्णा मोहिते, चंद्रकांत जाधव, संजय वाईकर, डॉक्टर असोशियशनचे डाॅ साजिद शेख, डॉ. मेश्राम, पापाभाई , मुन्नाभाई, प्रशांत दिंडोरकर, सुरेश मोरे, विनोद मोरे, राजु हिरे, जेम्स शिंगार, मुनीर शेख, विनू महाडिक व नागरिक मोठ्या संख्येने होते.
या वेळी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, नागपूर चाळ रहिवाशांसाठी पार्किंगची कोणतीही सुविधा नाही. या ठिकाणी 3 हजार 200 कुटुंबे राहत आहेत. तर महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड मध्ये सुमारे चार हजार कुटुंबे राहत आहेत. नागपूर चाळ ही विघोषित झोपडपट्टी आहे. या ठिकाणी असणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा 142 विविध प्रकारची दुकाने आहेत आहेत. तीन रुग्णालय, चार मेडिकल दुकाने तसेच दोन अधिकृत रिक्षा थांबा आहे. या सर्वांची पार्किंगची व्यवस्था ही सध्या तरी रस्त्यालगतच आहे. मात्र या ठिकाणी नो पार्किंग झोन झाल्यास जगण्याचा हक्कच हिरावून घेण्याची भावना सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली आहे.
संबंधित हा रस्ता यापूर्वीच शंभर फुटी करण्यात आलेला आहे. रस्ता प्रशस्त असल्यामुळे वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न येत नाही. तसेच महत्त्वाच्या व्यक्तींचा दौरा असल्यास या रस्त्यावरील वाहने नागरिकांकडून काढली जात आहेत. त्यामुळे महत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यात देखील कोणताही अडथळा येत नाही. याबरोबरच या रस्त्याला पर्यायी इतर अनेक रस्ते निर्माण झालेले आहेत. यामध्ये जुना एअरपोर्ट रस्ता, विमाननगर ते कल्याणी नगर कडे जाणारा रस्ता, तसेच एअरपोर्टवरून शाहू चौक, कॉमरझोन मार्गे पुणे शहरात जाणारा रस्ता आहे. त्यामुळे इतरही पर्याय सुविधामुळे नागरिकांना त्रास होत नाही.
या सर्वांचा विचार करता काही समाधानकारक तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांची आहे. यामध्ये जे नागपूर चाळ रहिवासी आहेत किंवा जे व्यवसाय करणारे आहेत, अशांच्या वाहनांना नागपूरचा रहिवासी संघाचा स्टिकर द्यावा. या लोकांनाच पार्किंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी. या व्यतिरिक्त वाहने लागल्यास त्यांच्यावर कारवाई करावी. त्यासाठी पार्किंगचे पट्टे आखून द्यावेत. तसेच सुरक्षेचा प्रश्न असेल तर या परिसरात नागपूर चाळ रहिवासी संघाच्या वतीने सीसीटीव्ही देखील लावण्यासाठी नागरिक तयार आहेत.
या सर्व बाबींचा विचार करता नुकताच काढलेला नो पार्किंगचा आदेश रद्द करावा अशी मागणी करण्यात आली.
या वेळी नागरिकांची होणारी गैरसोय व मागणी पाहता वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजकुमार मगर यांनी नो पार्किंच्या आदेशाला स्थगिती देत असल्याचे शिष्टमंडळाला सांगितले. तसेच जी 20 परिषद तसेच महत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे असल्यास या वेळी वाहने काढण्याचे आवाहन केले. याला नागपुर चाळ येथील रहिवाशांनी सकारात्मकता दर्शवली.
News Title | Pune News | Suspension of Nagpur Chal road no parking zone order| Former Deputy Mayor Dr. Success to Siddharth Dhende’s demand