Pune News | रस्त्यावरील भाजी विक्रेत्याचे पूरग्रस्तांसाठी ‘लाख’मोलाचे दान!
Maharashtra Flood – (The Karbhari News Service) – शनिपार चौकातील पदपथावर भाजी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या चरण नामदेव वनवे यांनी राज्यातील पूरग्रस्तांना मदत करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री सहायता निधीला तब्बल एक लाख 13 हजार 740 रुपयाचे दान दिले.
कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांच्यासमवेत वनवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीचा धनादेश आज सुपूर्त केला.
वनवे हे शंकर महाराजांचे निस्सीम भक्त आहेत. त्यांच्या घरातील महाराजांच्या पादुकांसमोर त्यांनी एक डबा ठेवलेला आहे. भाजी विक्रीतून आलेल्या रकमेपैकी दररोज शंभर रुपये ते या डब्यामध्ये साठवतात. आपदग्रस्तांना मदत करण्याच्या उद्देशानेच ही बचत केली जाते. ती आज मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आली.
वनवे म्हणाले, “आमची तिसरी पिढी भाजी विक्रीचा व्यवसाय करते. माझ्या आईने कोरोनाच्या काळात गरजवंतांना एक लाख रुपयांची मदत केली होती. आपल्याकडील पैसा हा इतरांच्या कामाला यावा अन्यथा तो दुःखाचा डोंगर आहे, अशी आईची शिकवण होती. तिच्या पश्चात मी हा वारसा पुढे नेत असून नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत करण्याच्या उद्देशाने दररोज शंभर रुपये बाजूला ठेवत आलो आहे. आज समाजाची गरज लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानुसार मी खारीचा वाटा उचलला आहे.”
—

COMMENTS