मनपातील कंत्राटी कामगारांनी एस आय सी चे लाभ घ्यावेत
– चंद्रकांत पाटील
पुणे :- राष्ट्रीय मजदूर संघातर्फे पुणे महानगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन (एस आय सी) कामगार राज्य विमा महामंडळ आचे उपायुक्त चंद्रकांत पाटील यांनी केले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून एडवोकेट अभय छाजेड हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले, पुणे महानगर पालिके मधील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना एस आय सी हा कायदा लागू होतो. या सर्व कामगारांनी लाभ घेतले पाहिजेत. वैद्यकीय कारणासाठी लहान-मोठे आजार, त्याचप्रमाणे मोठी ऑपरेशन्स यासाठी कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांना लाभ दिले जातात. त्याचप्रमाणे इतरही लाभ कसे व कोणते मिळतात याचे विवेचन त्यांनी यावेळी केले. जर एखादा कंत्राटदार ई एस आय सी चे फायदे कर्मचाऱ्यांना देत नसेल, किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असेल, त्यावर खडक कारवाई करण्यात येईल. त्यामध्ये राष्ट्रीय मजदूर संघाने पुढाकार घ्यावा व अशा कंत्राटदारांची नावे आम्हाला कळवावे असेही सांगितले.
यावेळी राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष कामगार नेते सुनील शिंदे यांनी पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचे इतरही अनेक प्रश्न कसे सोडवावेत व संघटनेच्या माध्यमातून संघर्ष कसा उभारावा, यासंदर्भात मार्गदर्शन केले या मार्गदर्शन शिबिरात पुणे महानगरपालिकेतील विविध विभागातील कंत्राटी कामगार उपस्थित होते.
COMMENTS