पुणे महापालिका प्रशासकांना मुदतवाढ कधी?
| राज्य सरकारचे अजूनही आदेश नाहीत
पुणे | महापालिका निवडणूक वेळेत न झाल्याने राज्य सरकारने महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती ६ महिन्यासाठी केली होती. ही मुदत आज संपत आहे. मात्र राज्य सरकारने पुणे मनपाच्या प्रशासकांना अजूनही मुदतवाढ दिलेली नाही. त्यामुळे सरकार च्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
राज्यातील ओबीसी आरक्षणाच्या तिढ्यामुळे, पुणे महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर प्रमुख महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका मुदतीत झालेल्या नाहीत. महापालिकेच्या 2017 मधील निवडणुकीनंतर अस्तित्वात आलेली पालिका सदस्यांची मुदत 14 मार्च 2022 मध्ये मध्यरात्री संपुष्टात आली. त्यामुळे कायद्यातील तरतुदीनुसार, राज्यशासनाकडून महापालिकेच्या कारभाराची जबाबदारी पालिका आयुक्तांकडे कायम ठेवत त्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली.
ही नियुक्ती सहा महिन्यांसाठी होती. ही मुदत बुधवारी संपत आहे. त्यातच, राज्य मंत्रिमंडळात सोमवारी झालेल्या बैठकीत जिल्हा परिषदांच्या प्रशासकांची मुदतवाढ करण्याचा निर्णय झालेला असला तरी पालिकांच्या प्रशासकांबाबत निर्णय झालेला नाही. परिणामी, रात्री उशिरापर्यंत नगरविकास विभागाकडून महापालिकेस प्रशासक मुदतवाढीबाबत काहीच कळविण्यात आलेले नव्हते.