Pune MP | निवडून आल्यानंतर खासदार लोकांच्या प्रश्नांत लक्ष घालू लागले! हे ही नसे थोडके!
Pune MP – (The Karbhari News Service) – लोकसभा निवडणूक झाली आणि पुणे शहराला अचानक कितीतरी खासदार मिळाले. विशेष म्हणजे निवडून आल्यानंतर देखील हे खासदार लोकांच्या प्रश्नासाठी महापालिकेत येऊ लागले. प्रशासक राज मध्ये लोकांना न्याय मिळाला नाहीच. शहरातील 8 आमदार देखील लोकांच्या प्रश्नासाठी फार काही करू शकले नाहीत. त्यामुळे आता थेट खासदारानीच पुणे महापालिकेत लक्ष घातले.
नेहमी होतं असं कि निवडणूक जवळ आल्यावर लोकप्रतिनिधी लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला सुरुवात करतात. यावेळी मात्र थोडंसं उलट घडत आहे. जिंकून आल्यावर लोकप्रतिनिधी लोकांच्या प्रश्नांत लक्ष घालू लागले आहेत. हा सकारात्मक बदल चांगलाच आहे.
पुणे शहरासाठी आता हक्काचे 4 खासदार झाले. यामध्ये मुरलीधर मोहोळ (पुणे लोकसभा), मेधा कुलकर्णी (राज्यसभा), सुप्रिया सुळे (बारामती लोकसभा) आणि डॉ अमोल कोल्हे (शिरूर लोकसभा) यांचा समावेश आहे. सुप्रिया सुळे यांच्या बारामती लोकसभेत खडकवासला विधानसभा मतदारसंघ येतो. तर अमोल कोल्हे यांच्या शिरूर मध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघ येतो. त्यामुळे आता या चौघांनी देखील महापालिकेत लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. नुकत्याच या सर्व खासदारांच्या महापालिका आयुक्त आणि अधिकाऱ्या सोबत बैठका झाल्या आहेत.
खासदार लक्ष देऊ लागले म्हणजे सगळेच प्रश्न सुटू लागले, अशातला भाग नाही. कारण प्रशासनाकडून सातत्याने कर्मचाऱ्यांची केली जात असलेली पिळवणूक तशीच सुरु आहे. त्यांना सध्या तरी कुणाचा आधार नाही. निवडणूक होण्या अगोदर समाविष्ट गावांत प्रश्न होते आणि आजही ते आहेत. येथील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी तरसावे लागते. रस्ते नाहीत, ड्रेनेज व्यवस्था नाही. पावसाळ्यात गुडघाभर पाण्यातून रस्ता शोधत जावे लागते. खासदारांनी हे प्रश्न मांडण्या ऐवजी तत्कालीन नगरसेवक आणि आताच्या आमदारांनी हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले पायऱ्या तर खासदारांना महापालिकेच्या पायऱ्या झिजवाव्या लागल्या नसत्या. प्रश्न अजूनही तेच आणि तसेच आहेत. त्या प्रश्नामुळे लोक निवडून देतात. लोकांचा तो भरवसा लोकप्रतिनिधींनी जपावा. एवढी माफक अपेक्षा.
| केंद्र सरकार ही देऊ लागले लक्ष
निवडून आल्यानंतर फक्त खासदारच नाही तर स्वतः केंद्र सरकार लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष देऊ लागले. सरकारने नुकतेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना पुणे दौऱ्यावर पाठवले होते. विशेष म्हणजे मंत्री आठवले यांनी महापालिका कर्मचाऱ्यांच्या प्रश्नात लक्ष घातले. अशी चर्चा आहे कि मागील पंचवार्षिक मध्ये मोदींनी मंत्र्यांना फार काम करू दिलेच नव्हते. प्रत्येक ठिकाणी एकटे मोदीच दिसायचे. त्याचाच फटका लोकसभेत पाहायला मिळाला. त्यामुळे आता मोदी सरकारने प्रत्येक मंत्र्याला कामे वाटून दिली आहेत. त्याचाच भाग म्हणून आठवले यांनी पुणे महापालिकेत लक्ष घातले. मात्र ही आढावा बैठक नावापुरती असायला नकोय. त्याचा सातत्याने पाठपुरावा देखील व्हायला हवाय आणि लोकांचे प्रश्न मार्गी लागायला हवेत.