Pune Metro | Toilet Seva App | पुणे मेट्रो स्थानकांवरील प्रसाधन गृह आता ‘टॉयलेट सेवा ॲप’ वर | ॲप’ द्वारे पुणे मेट्रोमधील प्रसाधन गृहांचे स्थान जाणून घ्या
Pune Metro News – (The Karbhari News Service) – आज महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर (Shravan Hardikar IAS) आणि टॉयलेट सेवा ॲपचे अमोल भिंगे (Amol Bhinge Toilet Seva App) यांनी टॉयलेट सेवा ॲपचे अनावरण केले. (Pune Metro Toilet)
पुणे मेट्रोच्या प्रत्येक स्थानकांवर महिला, पुरुष व दिव्यांगजन यांच्यासाठी स्वतंत्र प्रसाधन गृहांची व्यवस्था केलेली आहे. ‘टॉयलेट सेवा’ हे मोबाईल ॲप अमेरिका स्थित आयटी इंजिनियर .अमोल भिंगे यांनी बनविले आहे.
हे ॲप निशुल्क असून पुणे व पिंपरी चिंचवड शहरांमधील मधील सार्वजनिक प्रसाधनगृहांची अद्यावत माहिती व स्थान या ॲपद्वारे नागरिक जाणून घेऊ शकतात. त्यामुळे महिला व वृद्ध नागरिक, विद्यार्थी आणि इतर नागरिक यांना प्रसाधनगृह शोधण्यासाठी या ॲप द्वारे मोठी मदत होणार आहे.
टॉयलेट सेवा ॲप द्वारे ‘स्वच्छ प्रसाधनगृह’ अशी मोहीम राबविण्यात येत आहे. याद्वारे प्रसाधनगृहातील निटनेटकेपणा, स्वच्छता, पाण्याची उपलब्धता, नळ व बेसिन यांच्यामध्ये काही बिघाड असल्यास तो या ॲपद्वारे संबंधित संस्थेपर्यंत तक्रार /सूचना या स्वरूपात पोहोचवणे सहज शक्य होणार आहे. तसेच संबंधित संस्थेने तक्रार निवारण केल्यावर संबंधित तक्रारदाराला त्याचा अभिप्राय मिळणार आहे.
पुणे मेट्रो आणि टॉयलेट सेवा यांच्या समन्वयामुळे पुणे मेट्रोच्या प्रसाधनगृहांची अद्यावत माहिती नागरिकांना/ प्रवाशांना जाणून घेता येईल. तसेच प्रसाधनगृहांच्या संबंधीची तक्रार / सूचना ॲप द्वारे नोंदविता येणार आहे. यावेळी महामेट्रोचे व्यवस्थपकीय संचालक श्रावण हर्डीकर (भा.प्र.से), पुणे मेट्रो प्रकल्पाचे संचालक विनोदकुमार अग्रवाल (संचालन व प्रणाली), कार्यकारी संचालक डॉ. हेमंत सोनवणे (प्रशासन व जनसंपर्क) व राजेश द्विवेदी (संचालन, देखभाल व सुरक्षा) आणि वरिष्ठ उप महाव्यवस्थापक सुजित कानडे (प्रशासन/ जनसंपर्क) व उप महाव्यवस्थापक श्याम कुलकर्णी, पुणे महानगरपालिकेचे प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
——–
या प्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रावण हर्डीकर (भाप्रसे) यांनी म्हंटले की. “टॉयलेट सेवा ॲप’ हा एक अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. या ॲपच्या वापरातून पुणे व पिंपरी चिंचवड शहरांमधील सार्वजनिक प्रसाधनगृहांमध्ये नागरिकांना आमूलाग्र बदल करणे शक्य होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या ॲपचा जास्तीत जास्त वापर करावा”.