Pune Metro | मेट्रो स्टेशन बाहेर शेअर रिक्षा प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणार | मेट्रो प्रशासनाची मान्यता
| १ मे पर्यंत कामगार पुतळ्याची ही डागडुजी
Pune Metro – (The Karbhari News Service) – प्रवाशांच्या सोयीसाठी चार मुख्य मेट्रो स्टेशनवर शेअर रिक्षा सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली जाईल, अशी माहिती माजी आमदार आणि ‘वेकअप पुणेकर’ अभियानाचे संयोजक मोहन जोशी आणि रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार यांनी आज (शुक्रवारी) दिली.
वेकअप पुणेकर’ च्या ट्रॅफिक परिषदेत मेट्रो स्टेशन बाहेर शेअर रिक्षा सेवा यावर चर्चा झाली होती. त्या अनुषंगाने महा मेट्रो आणि रिक्षा पंचायत यांची एकत्रित बैठक घेतली, असे मोहन जोशी आणि नितीन पवार यांनी स्पष्ट केले.
महा मेट्रोचे प्रशासन, रिक्षा प़चायतीचे प्रतिनिधी यांची बैठक मोहन जोशी आणि नितीन पवार यांच्या पुढाकाराने घेण्यात आली. बैठकीला महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आणि हेमंत सोनावणे, तसेच मेट्रो मार्गावरील पौड रस्ता, शिवाजीनगर, राजा बहादूर मोतीलाल मिल (बंडगार्डन) रस्ता परिसरातील रिक्षा पंचायतीचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते. मुंबईमध्ये लोकल ट्रेन स्थानकाबाहेर शेअर रिक्षांची रांग दिसते. तशी रांग मेट्रो स्टेशन बाहेर दिसत नाही. शेअर रिक्षा वापरासाठी पुणेकरांची मानसिकता तयार करण्याची गरज बैठकीत व्यक्त करण्यात आली. रिक्षांची रांग ज्या मेट्रो स्टेशनच्या बाहेर लागू शकेल, अशा मार्गांचा आढावा घेणे, तिथे जागेची उपलब्धता करून देणे आणि प्रायोगिक तत्त्वावर शेअर रिक्षा सुरू करणे असा निर्णय बैठकीत झाला. प्रारंभी दोन ते चार मेट्रो स्टेशन बाहेर शेअर रिक्षा सुरू करायची आणि नंतर ते प्रमाण वाढवत न्यायचे. याचे सर्वेक्षण पुढील आठवड्यात सुरू होईल, अशी माहिती मोहन जोशी आणि नितीन पवार यांनी दिली.
महा मेट्रोच्या मुख्य कार्यालयाशेजारील कामगार पुतळा परिसराचे सुशोभीकरण करण्याची तयारी महा मेट्रो प्रशासनाने बैठकीत दाखविली.
बैठकीतील चर्चेत प्रशांत सुरसे, सुरेश कांबळे, बाळासाहेब पोकळे, रवींद्र पोरेड्डी, भरत उत्तेकर, सुरेश कानडे, दत्ता साळुंखे आदींनी सहभाग घेतला.