Pune Loksabha Voting | जिवंत मतदारांच्या नोंदी झाल्या मृत ! | मतदान केंद्र क्रमांक १८८,भवानी पेठेतील प्रकार
Pune Loksabha Voting – (The Karbhari News Service) – पुणे लोकसभा मतदार संघात मतदान करण्यासाठी आवश्यक पुरावे घेऊन उत्साहाने गेलेल्या अनेक मतदारांना मतदार यादीत त्यांचे नाव मयत असे नोंदल्याचे आढळल्याने मतदानापासून वंचित राहावे लागले.
युवक क्रांती दल, भारत जोडो अभियान चे कार्यकर्ते संदिप बर्वे यांना आणि काँग्रेस च्या बुथवरील कार्यकर्त्यांना हा प्रकार लक्षात आला. मतदान केंद्र क्र.१८८,महात्मा फुले पेठ ,शाळा नंबर ९५,खोली नंबर २ येथे मतदान असलेल्या ५ जणांच्या बाबतीत मयत नोंदी असल्याचे दुपारी १२ वाजेपर्यंत आढळले. नजीर करीम शेख(मतदार क्र.८९६),राजा मोहन गावंडे(७५८),हसन शेखलाल शेख(७७६),विजय तुकाराम कोंढरे (१११),फकीर अहमद शेख (३०४) या मतदारांच्या नावापुढे मयत अशी नोंद दिसल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले.
दुपारी १२ पर्यंत भवानी पेठ परीसरात मतदारांच्या नावापुढे मृत नोंद झाल्याचे प्रकार उघडकीस आल्याने युवक क्रांती दल, भारत जोडो अभियान चे संदिप बर्वे यांच्याकडून कारवाईची मागणी करण्यात आली. निवडणूक आयोगाकडे धाव घेऊन त्यांना मतदान करू दिले जावे यासाठी ते प्रयत्नशील राहिले,शिवाय सोशल मीडियावर व्हिडीओ प्रसारित करून त्यांनी शासनाचे लक्ष या प्रकाराकडे वेधले.