Pune Grand Tour | पुणे ग्रँड चॅलेंज टूरनिमित्त १९ जानेवारीला पुण्यातील प्रमुख रस्त्यावरील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी
| फर्ग्युसन कॉलेज रोड (एफ.सी. रोड), गणेशखिंड रोड, जंगली महाराज रस्ता (जे.एम. रोड) तसेच या मार्गांना जोडणारे उपरस्ते यांचा समावेश
Bajaj Pune Grand Challenge Tour – (The Karbhari News Service) – पुणे शहरात १९ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६’ च्या पार्श्वभूमीवर, सोमवार दि. १९ जानेवारी २०२६ रोजी शहरातील प्रमुख भागांतील शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश निर्गमित केले आहेत. (School Holiday on Monday)
या स्पर्धेतील ‘प्रोलॉग रेस’ सोमवार, १९ जानेवारी रोजी पुणे शहरात होणार असून, त्यानिमित्त सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत शहरातील प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये फर्ग्युसन कॉलेज रोड (एफ.सी. रोड), गणेशखिंड रोड, जंगली महाराज रस्ता (जे.एम. रोड) तसेच या मार्गांना जोडणारे उपरस्ते यांचा समावेश आहे. रस्ते बंद राहिल्यामुळे विद्यार्थ्यांना व पालकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोय होण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
यानुसार, पुणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजीनगर-घोले रोड, विश्रामबागवाडा-कसबा, ढोले पाटील रोड, भवानी पेठ, औंध-बाणेर, कोथरूड-बावधन, सिंहगड रोड तसेच वारजे-कर्वेनगर या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील सर्व अंगणवाड्या, शासकीय व खासगी प्राथमिक-माध्यमिक शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये तसेच व्यावसायिक शिक्षण संस्था सोमवार, १९ जानेवारी रोजी बंद राहतील.
हा सुट्टीचा आदेश केवळ सोमवार, १९ जानेवारी २०२६ या एका दिवसापुरताच लागू राहणार असून, मंगळवार दि. २० जानेवारीपासून सर्व शैक्षणिक संस्था नियमित वेळेनुसार सुरू राहतील. नागरिकांनी व पालकांनी वाहतूक व्यवस्थेतील बदल लक्षात घेऊन आपले नियोजन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS