Pune Congress Manifesto | कॉंग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित
Pune Congress – (The Karbhari News Service) – पुणेकरांचा अधिकारनामा असलेला “पुणे फर्स्ट” हा आघाडीचा जाहीरनामा आज काँग्रेस–शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आघाडीच्या वतीने कॉंग्रेस भवन येथे प्रकाशित करण्यात आला. पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर ही आघाडी ताकदीने निवडणूक लढत असून, सत्ताधारी तीन पक्षांमुळे पुणे शहराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. (Pune News)
गुरुवारी काँग्रेस भवन येथे ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री व पुण्याचे प्रभारी आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी डिजिटल जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. या प्रसंगी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी मंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, ॲड. अभय छाजेड, माजी आमदार दिप्ती चौधरी, माजी महापौर प्रशांत जगताप, शहर वरिष्ठ उपाध्यक्ष अजित दरेकर, शहर युवक अध्यक्ष सौरभ अमराळे आदी उपस्थित होते.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, सत्ताधारी पक्षांमुळे पुण्यात उद्योग, वाहतूक आणि प्रदूषणाच्या समस्या गंभीर झाल्या आहेत. त्यामुळे उद्योग पुणे सोडून जात असून नवीन गुंतवणूक शहरात येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. राज्य सरकारकडून मोठमोठ्या गुंतवणूक घोषणांचा गाजावाजा केला जातो; मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस गुंतवणूक दिसून येत नाही. नागरी सुविधा कोलमडल्यामुळे सेमीकंडक्टरसारखे अत्याधुनिक उद्योग पुण्यात येत नाहीत. काँग्रेस सत्तेत आल्यास भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्याचे अभिवचन देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चव्हाण यांनी मेट्रो प्रकल्पाबाबत सांगितले की, आपण मुख्यमंत्री असताना मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये मेट्रो आणण्याचा निर्णय घेतला होता व त्याचे कागदोपत्री पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे श्रेयवाद करू नये. घोषणा करण्यासाठी पैसे लागत नाहीत, मात्र चुकीच्या पद्धतीने योजना राबवून सत्ताधारी भ्रष्टाचार करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. स्मार्ट सिटी योजना भाजपाने गुंडाळली असून शहराची शैक्षणिक व औद्योगिक ओळख धोक्यात आली आहे. जैवविविधतेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे टेकड्या नष्ट होत असून, सत्तेत आल्यावर या विषयावर गांभीर्याने काम केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. लाडकी बहीण योजना चुकीच्या पद्धतीने राबविल्यामुळे अनेक गैरप्रकार घडल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी सतेज पाटील म्हणाले की, “पुणे फर्स्ट” हेच आमचे प्रमुख ध्येय राहणार आहे. पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर युती सरकार अपयशी ठरले आहे. भाजप जाहीरनाम्यात केवळ घोषणा करते; मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. पुणेकरांनी आम्हाला पाच वर्षांची संधी द्यावी, दिलेले शब्द आम्ही पाळू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहरात कोयता गँग वाढत असून कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. भाजप गेली पाच वर्षे सत्तेत होती, त्यांनी काय केले याचे उत्तर द्यावे, अशी मागणी करत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोप म्हणजे पुणेकरांच्या डोळ्यात धूळफेक असल्याची टीका त्यांनी केली.

COMMENTS