Pune Congress | डॉ.संपदा मुंडे मृत्यू प्रकरणी पुणे महिला काँग्रेस, डॉक्टर सेलचे आंदोलन | महिला आयोग अध्यक्षा चाकणकर यांची हकालपट्टी करा | आंदोलकांची मागणी
Pune News – (The Karbhari News Service) – फलटण मधील डॉ.संपदा मुंडे यांच्या मृत्यूप्रकरणी पुणे महिला काँग्रेस आणि डॉक्टर सेल यांच्या वतीने आज (शुक्रवारी) लाल महाल येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हकालपट्टीची मागणीही यावेळी आंदोलकांनी केली. (Phaltan Doctor Suicide Case)
आंदोलनाचे नेतृत्व पुणे शहर महिला काँग्रेस अध्यक्षा स्वाती शिंदे यांनी केले. आंदोलनात लता राजगुरु, स्नेहल पाडळे, अंजली सोलापुरे, हसीना अपा, राजश्री अडसूळ, रोहिणी मल्लाव, रेखा जैन, ॲड राजश्री आडागळे, सुविधा त्रिभुवन, आरती चव्हाण आदी महिला काँग्रेसच्या नेत्या आणि कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.
फलटण येथे डॉ. संपदा मुंडे या निष्पाप, कर्तव्यनिष्ठ महिला डॉक्टरने काही अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या सततच्या त्रासामुळे आत्महत्या केली. मात्र ही आत्महत्या नसून ही थेट हत्या आहे, असा आरोप आंदोलकांनी केला.
दुर्दैव म्हणजे, घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री तत्काळ त्या ठिकाणी येऊन संबंधितांना क्लीन चिट देतात. अशी भूमिका घेतल्याने तपास प्रक्रियेवर दबाव येतो आणि पोलीस यंत्रणेचा निष्पक्षपणा धोक्यात येतो, असेही आंदोलकांनी यावेळी बोलताना सांगितले. राज्य सरकारचा तीव्र निषेधही आंदोलकांनी केला.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी डॉ.मुंडे यांच्या मृत्यूबाबत सखोल चौकशी करण्याऐवजी डॉ.मुंडे यांच्या वर्तनाबाबतच संतापजनक विधाने केली आणि भाजपच्या नेत्यांना वाचवायचा प्रयत्न केला, हे धक्कादायक असून चाकणकर यांची आयोगाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी पुणे शहर महिला काँग्रेसने केली.
काँग्रेस नेते आदरणीय राहुलजी गांधी अन्याय, असत्य आणि अत्याचाराविरुद्ध निडरपणे लढत आहेत, तसेच आम्हीही त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन प्रत्येक अन्यायाविरुद्ध लढत राहू, असा निर्धार महिला आंदोलकांनी व्यक्त केला.
आगामी काळात महिलांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि सुरक्षेसाठी शहरभर मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभे केले जाईल, असे पुणे शहर महिला काँग्रेस अध्यक्ष स्वाती शिंदे यांनी जाहीर केले.

COMMENTS