Pune Congress | काँग्रेसच्या इच्छुकांचे जोरदार शक्तिप्रदर्शन! | ४१ उमेदवारांनी दिल्या मुलाखती | शिवाजीनगर मधून १२ तर कोथरुड मधून केवळ एकच इच्छुक
Vidhansabha Election – (The Karbhari News Service) – पुणे शहरातील जवळपास सात विधानसभा मतदार संंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारींनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. एकुण ४१ उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. मुलाखतींमध्ये आजी-माजी आमदार, माजी राज्य मंत्री, पदाधिकारी, नगरसेवक यांनी प्रामुख्याने मुलाखती दिल्या आहेत. (Pune Congress Bhavan)
यातही शिवाजीनगर मतदार संघातुन सर्वाधिक १२ इच्छुक उमेदवार आहेत तर कोथरुड मधुन सर्वात कमी म्हणजे केवळ एकच इच्छुक उमेदवार आहे.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने विधानसभा निवडणुक २०२४ साठी काँग्रेस भवन येथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
राज्याच्या माजी मंत्री यशोमती ठाकुर यांच्या प्रमुख उपस्थितीत व शहराध्यक्ष अरविंद शिंदे व पक्षाचे उपाध्यक्ष अजित दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानसभा निहाय इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
काँग्रेसकडून शहरातील सर्व मतदार संघातुन निवडणुक लढण्यास इच्छुक तयार असल्याची बाब निदर्शनास आलेली आहे. शिवाजीनगर मतदार संघातुन तब्बल १२ इच्छुकांमध्ये उमेदवारीसाठी स्पर्धा आहे.
त्यात माजी आमदार दिप्ती चवधरी, अनिल पवार, माजी नगरसेवक दत्तात्रय बहिरट, सनी निम्हण, मनीष आनंद, पुजा आनंद, जावेद निलगर, कैलास गायकवाड, राज निकम, महेंद्र सावंत, अॅड. रमेश पवळे, संजय अग्रवाल आदी इच्छुक आहेत.
कसबा मतदार संघातुन सहा उमेदवार इच्छुक आहेत. त्यात विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर हे पुन्हा प्रमुख दावेदार आहेत. याबरोबर कमल व्यवहारे, मुख्तार शेख, संगीता तिवारी, बाळासाहेबर दाभेकर, शिवानंद हुल्याळकर यांनीही निवडणुक लढविण्यासाठी इच्छुकता दर्शविली आहे.
पुणे कॅन्टोन्मेटमधून अकरा जण इच्छुक आहेत. त्यात प्रामुख्याने माजी राज्य मंत्री रमेश बागवे यांचा समावेश आहे.
याबरोबरच अविनाश बागवे, अॅड. अविनाश साळवे, मुकेश धिवार, भीमराव पाटोळे, रविंद्र आरडे, लता राजगुरू, सुनिल भोसले, छाया जाधव, सुजित यादव, मिलिंद अहिरे यांनीही मुलाखती दिल्या आहेत.
वडगाव शेरी मतदार संघातुन पाच उमेदवार इच्छुक आहेत. त्यात संजय पाटील, रमेश सकट, राजू ठोंबरे, सुनिल मलके, जोसेफ डिसुझा आदींचा समावेश आहे. पर्वती मतदार संघासाठी तीन जणांनी मुलाखती दिल्या आहेत.
त्यात आबा बागुल, संभाजी जगताप, संतोष पाटोळे यांनी उमेदवारीसाठी दावा केला आहे. हडपसर मतदार संघातून माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्यासह डॉ. सुदर्शन घेराडे, हाजी उस्मान हशमुद्दीन तांबोळी हे तीन उमेदवार निवडणुक़ लढविण्यासाठी इच्छुक आहेत. कोथरुड विधानसभा मतदार संघातून संदीप मोकाटे यांनी एकट्यानेच मुलाखत दिली आहे.
COMMENTS